नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’, ‘नाच रे मोरा’, ‘एक होता पोपट’, ‘ चिऊताई चिऊताई दार उघड’, अशी गीते अजूनही कानाभोवती रुंजी घालतात.  लहानपणी आई हा घास काऊचा, चिऊचा म्हणत एकेक घास बाळाला भरवते.  आकाशात उडणाऱ्या, खिडकीत येऊन बसणाऱ्या किंवा झाडाच्या फांदीवर झोके घेणाऱ्या  पक्ष्यांचे आकर्षण आपल्याला बालपणापासूनच असते.

शाळेत निसर्गसहली दरम्यानही पक्ष्यांच्या दुनियेतील आनंदाचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. भारतात जलवायुमान आणि नैसर्गिक भूरचनेच्या विविधतेमुळे पक्ष्यांच्या 2100 जाती व उपजाती  आहेत. हंस, बदक, तितर, कबूतर, पोपट, साळूंकी मैना, कोकीळा, कावळा, चिमणी बगळा, पारवा आढळतात. सुतार, खंड्या, गिधाड, घार इ. पक्षी भारतात बहुतेक सर्वत्र आढळतात.  गिधाड, घार व कावळ्यांचे महत्व अपमार्जक म्हणून आहे.  चास, मलबारी धनेश, बुलबुल, रोहीत, हरीयाल, मोर, माळढोक, खंड्या, पाचूकवडा या पक्ष्यांचे आपल्याला विशेष आकर्षण आहे.  यातील काही प्रजाती दुर्मीळ होत आहेत. 

लहानपणी दिसणारे चिमणी, बगळे, पोपटांचे थवे दिसेनासे झाले. वेगाने होणाऱ्या  शहरीकरणामुळे ही ‘पक्ष्यांची दुनिया’ आपल्यापासून दूर जातेय. नव्या पिढीला कदाचीत काही पक्षी केवळ छायाचित्रात पहाण्याचे भाग्य आहे, कारण सभोवतीच्या गोंगाटात पक्ष्यांचा मुक्त विहार शक्य नाही.  अजूनही दाराशी येणारी चिमणी किंवा पोपट आपल्याला आनंदाचे दोन क्षण देऊन जातात.  पक्ष्यांच्या दुनियेशी असलेले हे नाते घट्ट करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला प्रयत्न करण्याची गरज आहे.

राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकांचे महत्व विषद व्हावे, लोकजागृती व्हावी याकरीता शासन प्रयत्नशील आहे.  राज्य प्राणी, पक्षी, वृक्ष, फूल, फुलपाखरु, कांदळवन वृक्ष अशी मानचिन्हे शासनाने घोषित केली आहेत.  पक्षी हा सृष्टीतील महत्वाचा घटक आहे.  जगभरातील पक्ष्यांची जैवविविधता झपाट्याने कमी होत  आहेत. अनेक पक्षी प्रजाती दुर्मिळ श्रेणीत समाविष्ट होत आहेत.  राज्यातील पक्ष्यांचे महत्व प्रत्येक नागरीकापर्यंत पोहचवून त्यांच्या संरक्षणाप्रती जबाबदारी स्पष्ट व्हावी यासाठी व्यापक जनजागृती होण्याची गरज आहे.

देशात आणि राज्यात पक्षी संवर्धन, संशोधनाच्या क्षेत्रात व्यापक काम झालेले आहे.  भारतीय पक्षीविश्व व पक्षीअभ्यासशास्त्रास जागतिक स्तरावर पोहोचवणारे पद्मविभूषण (स्व.) डॉ. सलीम अली हे एक आदरणीय नाव आहे.  महाराष्ट्र राज्यातील वन्यजीव विषयक साहित्य निर्मितीत अग्रणी असणारे साहित्यिक व सेवानिवृत्त वनाधिकारी श्री. मारुती चितमपल्ली यांचेही नाव या क्षेत्रात आदराने घेतले जाते.

भारतीय उपखंडातील पक्ष्यांच्या निरिक्षणासाठी आखलेल्या विविध अभ्यास मोहिमा, दुर्मिळ पक्ष्यांचे लावलेले शोध,  तसेच पक्ष्यांसंबंधी लिहिलेले अनेक ग्रंथ याकरिता सलीम अली प्रसिद्ध आहेत. त्यांचे कार्य पक्षिविज्ञानाच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा समजला जातो. त्यांच्या प्रयत्नातून भारतात केवलादेव घाना, चित्रस, पॉईंट कॅलीमर, हरिके लेक ही पक्षी अभयारण्ये निर्माण झाली.

मारुती चितमपल्ली यांनी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य केले. त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात भरीव कामगिरी केली. पक्षीतंज्ञ म्हणून त्यांची ख्याती झाली. त्यांनी वन्यजीवन व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षीजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले.

योगायोगाने या दोघांचा जन्मदिवस हा नोव्हेंबर महिन्यात येतो आणि नोव्हेंबर महिन्याचा काळ हा पक्षी स्थलांतराच्या दृष्टीने महत्वाचा आहे.  मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन 5 नोव्हेंबर असून  (स्व.) डॉ. सलीम अली यांची जयंती 12 नोव्हेंबरला असते.  या दोन्ही दिवसाचे औचित्य साधून 5 ते 12 नोव्हेंबरपर्यंतचा आठवडा ‘पक्षी सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 

प्रत्येक पक्ष्यांचे रंग निराळे, आवाज निराळा, आकाशातील विहाराच्या पद्धतीही वेगळ्या आहेत.  पक्षी निश्चितवेळीच विशिष्ट प्रदेशात कसे पोहोचतात, त्यांना मार्ग कसा कळतो, वाऱ्यांच्या बदलत्या प्रवाहाचे आव्हान ते कसे पेलतात, असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण  होतात. डॉ. सलीम अली असोत वा चितमपल्ली, पक्षी तज्ज्ञांनी त्या दुनियेला स्पर्श करण्याच्या प्रयत्न केला आणि त्याचा आनंदही घेतला,  नव्हे तो आपल्यासमोरही ठेवला आहे.

  या सप्ताहाच्या निमित्ताने पक्ष्यांच्या दुनियेत जाण्याचा  आणि त्यांच्या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करु या. कर्नाळा, नानज, रेहेकूरी, नांदूर-मधमेश्वर अशी अभयारण्ये आपल्या राज्यात आहेत. एवढेच काय गावाबाहेरील दाट वनराईतही अनेक आवडत्या पक्ष्यांना पाहता येईल. आपल्या आवडत्या पक्ष्यांचे छायाचित्र काढून सोशल मिडीयावर पोस्ट करु या आणि हो, त्यांच्याशी मैत्री देखील वाढवूया !