नंदुरबार दि. (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी ग्राहक जागृतीचे विधायक उपक्रम राबवावेत. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी त्यांना कायद्यातील तरतुदींची माहिती द्यावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव तसेच परिषदेचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
बैठकीत व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक, वीज देयकाबाबतच्या तक्रारी आणि नंदुरबार शहारातील वाहतुक समस्येविषयी चर्चा करण्यात आली. व्यापाऱ्यांना शेतमाल विक्री करतांना घ्यावयाच्या खबरदारीबाबत शेतकऱ्यांना जागरुक करावे असेही श्री. पाटील यावेळी म्हणाले.
बैठकीत सदस्य वासुदेव माळी यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.