नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2021-2022 साठी ग्रामपंचायतींनी दोन दिवसात आराखडा अंतिम करावा आणि 2020-21 चा पुरवणी आराखडा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा अंतर्गत ‘मिशन 120’ बाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी शाहूंराज मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी भारुड, जिल्हा वनसंरक्षक सुरेश केवटे आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, गतवर्षी झालेल्या 67 कोटी खर्चाच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत चांगले काम झाले आहे. यावर्षी 120 कोटींची कामे करण्याचे उद्दिष्ट ठेऊन त्यासाठी आवश्यक नियोजन करावे. कृषी विभागाने फळबाग लागवडीवर भर द्यावा, त्यामुळे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहीत करावे. प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्यात यावी. धडगाव तालुक्यात रस्त्यांची कामे घेण्यात यावीत. तोरणमाळसारख्या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने वन विभागाने स्थानिकांना रोजगार देणारे उपक्रम सुरू करावे. वनक्षेत्र वाढविण्यासाठी रोपवाटीकांची निर्मिती आणि वृक्ष लागवडीवर भर द्यावा. अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगा अंतर्गत अधिक कामे सुरू करावीत, असे त्यांनी सांगितले.
श्री.गावडे म्हणाले, गट विकास अधिकाऱ्यांनी घरकूलाच्या कामांवर विशेष लक्ष केंद्रीत करावे. कामांचे जिओ टॅगिंग करण्यात यावे. इतर यंत्रणांनीही कामांना गती द्यावी आणि तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत यावर्षी 30.14 लक्ष मनुष्य दिवसाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून 23.74 लक्ष पूर्ण करण्यात आले आहे. 119 कोटी 65 लक्ष रूपायापैकी 64 लक्ष पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत 1676 कामे सुरू असून 7917 मजूर उपस्थिती आहे, अशी माहिती श्री.मोरे यांनी यावेळी दिली.