नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणू लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागरण अभियान मोहिमेचा नंदुरबार जिल्ह्यातील शुभांरभ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, सहायक प्रसिध्दी अधिकारी सदाशिव मलखेडकर, युनिसेफ सल्लागार डॉ.हर्षदा पवार  आदी उपस्थित होते.

प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो पुणे  आणि गोवा राज्य माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्या उपक्रमांतर्गत  जनजागृती व्हॅन प्रत्येक दिवशी तालुक्यातील गावागावांमध्ये कोरोना विषयक संदेशाचा आणि लसीकरणाचा प्रचार प्रसार करणार आहे. यावेळी कोरोना लस तसेच लसीकरणाविषयी पसरलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनतेत जागृती करणे, तसेच आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात नंदुरबार येथे 25 ते 26 फेब्रुवारी, नवापूर येथे 27 ते 28 फेब्रुवारी ,शहादा येथे 1 ते 2 मार्च, तळोदा येथे 3 ते 4 मार्च, अक्कलकुवा येथे 5 मार्च तर अक्राणी येथे 6 मार्च आदी ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे.