नंदुरबार (प्रतिनिधी) -‍पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड-19 चा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आरोग्य तपासणी, सीमाबंदी, स्वच्छता, मदत कार्य, रुग्णालय सज्जता अशा विविध पातळ्यांवर प्रशासनाने तयारी केली आहे.

भविष्यातील संभाव्य आपत्तीला सक्षमतेने सामारे जाण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील 125 दवाखान्यात एकूण 1084 बेड्स आहेत. एक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यात 52 बेड्स उपलब्ध आहेत. या कक्षात 11 रुग्ण दाखल आहेत. याशिवाय जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 क्वॉरंटाईन कक्ष स्थापन करण्यात आली असून 334 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. 22 संशयित व्यक्तींना या कक्षांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे, तर 24 व्यक्तींना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

त्रिस्तरीय रचनेनुसार कोविड केअर सेंटर 6 असून त्याची क्षमता 334 आहे. कोविड हेल्थ सेंटर 5 असून त्याची क्षमता 210 आहे. कोविड हॉस्पिटल 1 असून त्याची क्षमता 100 बेड्सची आहे. जिल्ह्यात 3 व्हेंटीलेटर उपलब्ध असून 10 अतिरिक्त व्हेंटीलेटर्सची मागणी नोंदविण्यात आली आहे. मुबलक प्रमाणात औषधे, सॅनिटायझर, मास्क उपलब्ध आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी रिसोर्स मॅपिंग करण्यात आले आहे.

बीएसएल-3 लक्षणांनी बाधित असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी  100 कर्मचारी व इतर पॅरामेडीकल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात विदेशातून प्रवास करून आलेल्य 48 प्रवासी आले होते. त्यांना क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्यात कोविड-19 आजाराची लक्षणे आढळून आलेली नाहीत.

जिल्ह्यात बाहेरील राज्य व जिल्ह्यातील मजूरांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी 10 निवारा गृह स्थापन करण्यात आली असून त्याची क्षमता 614 आहे. अकोला, जळगाव जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेश, गुजरात, प.बंगाल, राजस्थान आणि ओडीसा या राज्यातील 177 व्यक्तींना दाखल करण्यात आले आहे. यापैकी कुठल्याही व्यक्तीत लक्षणे आढळून आलेली नाहीत. निवारा गृहामध्ये भोजन व वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. नंदुरबार शहरात 3 हजार लोकांना स्वयंसेवकांमार्फत भोजन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

बाहेरून येणाऱ्या व्यक्तींमुळे संसर्ग होऊ नये यासाठी सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. पोलीस विभागामार्फत 12 आंतरराज्य चेक पोस्ट तर 10 जिल्हास्तरीय चेक पोस्ट स्थापन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या 397 वाहनांना परिवहन विभागाने वाहतूकीसाठी सुरक्षा पास दिले आहेत. चेक पोस्टवरून 22 मार्चपासून 16 हजार 691 वाहनांची तपासणी करण्यात येऊन अत्यावश्यक वस्तूंची 4 हजार 451 वाहने सोडण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात, मध्यप्रदेश आणि धुळे जिल्ह्याच्या सीमावर्ती 161 गावात ग्रामरक्षक दलांची स्थापना करण्यात आली आहे. या दलात माजी सैनिक, ज्येष्ठ नागरीक, पोलीस पाटील, कोतवाल, एनसीसी कॅडेट आदींचा समावेश आहे. ग्रामरक्षक दल परराज्यातून किंवा परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवत आहे. नंदुरबार तालुका 23, नवापूर 40, तळोदा व शहादा प्रत्येकी 17 , अक्कलकुवा 38 आणि अक्राणी तालुक्यात 26 ग्रामरक्षक दल स्थापन करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील 2150 किराणा दुकाने व 673 औषध दुकाने सुरू असून नागरिकांसाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली  आहे. 10 एप्रिलपर्यंत 52 हजार 437 क्विंटल धान्य वाटप करण्यात आले होते. येत्या आठवड्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटपासाठी 5701 मे.टन तांदळाची वाहतूक सुरू आहे.

केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी मे व जून महिन्याकरिता 983 मे.टन. गहू व 635 मे.टन तांदळाचे नियतन प्राप्त झाले आहे. गहू 8 रुपये तर तांदूळ 12 रुपये दराने वितरीत करण्यात येणार आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे.

 गरीबांना कमी दरात भोजन प्राप्त व्हावे यासाठी जिल्ह्यात शिवभोजन केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. एकूण 11 ठिकाणी केवळ 5 रुपयात भोजनाची थाळी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण मदत कार्यासाठी 41 स्वयंसेवी संस्थाचे सहकार्य लाभले आहे. जिल्ह्यातील सर्व 6 कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू आहेत.

जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. आतापर्यंत कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नसून हीच परिस्थिती कायम रहावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे डॉ.भारूड यांनी सांगितले. नागरिकांनी आणखी काही काळ धैर्याने घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे व जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.