नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक असल्याने विविध यंत्रणेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
सर्व उपविभागीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकीत्सक, कार्यकारी अभियंता,जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर इमारतीची तपासणी करुन त्यामध्ये रुग्णांसाठी आवश्यक साहित्य हे कुठल्याही क्षणी वापरता येतील अशा स्थितीत आणून ठेवण्याबाबत कार्यवाही करावी.
जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी सामान्य चिकित्सकाकडून नियमित आढावा घेऊन त्यांचेकडे उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची माहिती घ्यावी. त्यापैकी लक्षणे असलेल्या संशयीत रुग्णांची माहिती घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी.
जिल्हा आरोग्य अधिकरी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी खाजगी रुग्णालयांना नियमित भेटी द्याव्यात. सौम्य, अतिसौम्य लक्षणे असलेल्या कोविड बाधीत किंवा संशयीत रुग्णांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती गृह विलगीकरण, अलगीकरणाची रितसर परवानगी घेऊन त्याबाबतच्या नियमांचे पालन करीत आहे किंवा नाही याची तपासणी करावी.
कोविड बाधीत रुग्णांच्या संपर्कात असलेल्या कमीत कमी 20-30 उच्च धोका संपर्कातील व कमी धोका संपर्कातील व्यक्तींचा शोध घेवून त्यांना गृह विलगीकरण किंवा अलगीकरण करावे. बाधीत रुग्णांना विषाणूचा संसर्ग कुठून झाला याबाबत ठिकाणाचा, कार्यक्रमाचा शोध घेवून त्या ठिकाणी उपस्थित व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करावी.
सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी एखाद्या परिसरात कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास सदरचा परिसरातील व्यक्तींच्या हालचालींवर निर्बंध लागू करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार प्रतिबंधीत क्षेत्र तयार करावे.अशा ठिकाणी मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी.
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहायक आयुक्त, औषध निरीक्षक,औषध प्रशासन विभाग, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी सिटी स्कॅन सेंटर, खाजगी रेडीओलॉजी, पॅथोलॉजी लॅब येथे आढळून येणाऱ्या कोविड संशयित रुग्णांचे अहवाल जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविणे बंधनकारक करण्याबाबत कळवावे व सदर ठिकाणी नियमित भेटी द्याव्यात.
पोलीस विभाग, घटना व्यवस्थापक, उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर मोठ्या प्रामाणात गर्दी होणारे कार्यक्रमांना नियंत्रित करावे. लग्न समारंभात एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. लग्न समारंभासाठी स्थानिक पोलीस स्टेशन व स्थानिक स्वराज्य संस्थाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. मंगल कार्यालय, लॉन्स, हॉलच्या ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्ती व 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करावी.
पोलीस विभाग, मुख्याधिकारी ,राज्य उत्पादन शुल्क, अन्न प्रशासन विभाग यांनी उपहारगृहे, रेस्टॉरंट, बार, इत्यादी आदरातिथ्य सेवा 50 टक्के क्षमतेसह सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरु राहतील यांची खातरजमा करावी.
कुलसचिव, कॉलेजचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) यांनी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मास्कचा वापर करतात का हे तपासावे. प्रत्येक वर्गात सॅनिटायझर अथवा हात धुण्यासाठी साबण उपलब्ध ठेवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करारवी. तसेच संशयीत विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावीत.
शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक , मुख्याधिकारी यांनी खाजगी कोचिंग क्लासेस, स्पर्धा परिक्षा केंद्रे इत्यादीच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन, मास्क, सॅनीटायझरचा वापर होत आहे किंवा नाही यांची तपासणी करावी.
पोलीस विभाग, मुख्याधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केट, शॉपींग कॉम्प्लेक्स , मॉल याठिकाणी सर्व दुकानदार, त्याचे कर्मचारी, विक्रेते यांना मास्क लावणे बंधनकारक करावे. तसेच प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर उपलब्ध राहील व एकाचवेळी केवळ 5 ग्राहकच उपस्थित राहतील याबाबत कार्यवाही करावी.
सर्व कार्यालय प्रमुखांनी शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक करावे. सॅनिटायझर वापर ,हात धुण्यासाठी साबण तसेच कर्मचाऱ्याने मास्क वापरणे तसेच दुपारचे जेवण एकत्रित करणे याबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करावे.
पोलीस विभाग, जिल्हा परिषद, उपविभागीय दंडाधिकारी, मुख्याधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी यांनी मास्कचा वापर न करणाऱ्यावर पोलीस विभागामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या फिरत्या पथकामार्फत दंड आकारणी करण्याबाबत निर्देश द्यावेत.
पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आगार व्यवस्थापक, रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांनी रेल्वे, एस.टी. बसेस, ट्रॅव्हल्स, रिक्षा, कॅब, कालीपीली यांना अनुज्ञेय क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्याबाबत बंदी करावी. जास्त प्रवासी बसल्यास दंडात्मक कार्यवाही करावी.
मुख्याधिकारी नगर पालिका, नगर पंचायत यांनी सार्वजनिक उद्याने फक्त सकाळी 5 ते 9 यादरम्यान व्यायाम, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांसाठीच खुले ठेवावेत, परंतु सदरच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मुख्याधिकारी ,करमणूक कर निरीक्षक, संबंधित व्यवस्थापकांनी सिनेमागृहामधील सर्व प्रेक्षक, कर्मचारी यांना मास्कचा वापर करण्याबाबत सुचना द्याव्यात.
मुख्याधिकारी ,आगार व्यवस्थापक, रेल्वे स्टेशन व्यवस्थापकाने बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक प्रसाधन गृहे व इतर ठिकाणच्या आपल्या कार्यक्षेत्रात वेळोवेळी निर्जंतूकीकरण करावे.
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेले निर्देश, नियमावली, कार्यप्रणाली आलेले आदेश लागू राहतील. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.