नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्यादृष्टीने प्रशासनाने आवश्यक पूर्वतयारी करावी आणि मृत्युदर कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

ॲड.पाडवी म्हणाले, लहान मुलांवर उपचार करण्यासाठी आवश्यक सुविधा आतापासून निर्माण करा. म्युकर मायकोसिसच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करा. ग्रामीण भागातील लसीकरणाला गती देण्यात यावी. अनावश्यक  बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी.

बाजाराच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. दुर्गम भागात संसर्ग वाढणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. बँकेच्या बाहेर मंडपाची व्यवस्था करून शारीरिक अंतराचे पालन होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. खावटी अनुदान योजनेतील निधी वितरणाबाबत दैनंदिन आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. लसीकरणासठी प्रशानातर्फे ग्रामीण भागात व्यापक जनजागृती तसेच शिबिरांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.