नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लू रोगाच्या प्रादुर्भाव तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील पशुपालक, कुक्कूटपालन व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी जैवसुरक्षा उपाययोजनेचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
पोल्ट्री फार्ममध्ये कामकाज करणाऱ्या व्यक्तींनीच पोल्ट्रीफार्म मध्ये प्रवेश करावा. इतर कोणत्याही व्यक्तींना फार्ममध्ये जाण्यास प्रतिबंध करावा. बाहेरील कोणतेही पक्षी, प्राण्यांना पोल्ट्री फार्ममध्ये ठेवू नये. पोल्ट्रीफार्ममध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचे बूट, कपड्यांसह हातपाय पोल्ट्रीफार्म मध्ये जाण्याअगोदर व बाहेर आल्यानंतर जंतूनाशकाचा वापर करुन स्वच्छ करावेत. अनुषंगीक साहित्य, वस्तू व पक्षी इतर फार्म मधून आणायचे किंवा पाठवायचे असल्यास जंतूनाशकाचा वापर करुन स्वच्छ करावेत.
पोल्ट्रीफार्म मधील पक्ष्यांचे पिंजरे नेहमी स्वच्छ ठेवावेत. पक्ष्यांचे खाद्य व पाणी दररोज बदलावे. सद्य:स्थितीत असलेल्या पक्ष्यांमध्ये नवीन पक्ष्यांचा समावेश लगेच करु नये, नवीन आणलेल्या पक्ष्यांना कमीत कमी 30 दिवस वेगळे ठेवावे. बर्ड फ्लू रोग सदृश्य लक्षणांचे पोल्ट्रीधारकांनी निरीक्षण करावे, ज्यामध्ये पक्ष्यांच्या डोळ्यांच्या आजूबाजूस, मान, डोके सुजलेले, नाकातून स्त्राव, तुरा, कोंब व पायाच्या रंगात बदल होणे, अंडी उत्पादनात घट, अचानक कमकुवतपणा येणे, पंख खाली पडणे, हालचाल कमी होणे इत्यादी लक्षणे आढळल्यास रोग सदृश्य पक्षांची माहिती त्वरीत जवळील पशुवैद्यकीय संस्थांना द्यावी.
पोल्ट्रीफार्म धारकांनी पक्ष्यांची वर्गवारी वयानुसार करणाऱ्या प्रणालीचा अवलंब करावा, ज्यामध्ये एकाच वयाचे पक्षी एकावेळी आणणे व काढणे या पध्दतीचा अवलंब करावा. एका पोल्ट्रीफार्म मधून दुसऱ्या पोल्ट्रीफार्म मध्ये जाणे टाळावे, जर जाणे गरजेचे असेल तर संबंधीतांचे बुट व कपडे जंतूनाशकांनी स्वच्छ करावेत.
परसातील कुक्कुट पालकांनी जैवसुरक्षा प्रणालीसाठी पुढील बाबींचा अवलंब करावा:
कुक्कुट पालकांनी आपले पक्षी बंदिस्त ठेवावेत, इतर वन्यपक्षी व शेजाऱ्यांच्या पक्ष्यांच्या संपर्कात आपल्या पक्षांचा संपर्क येऊ देऊ नये. पक्ष्यांची जागा व परिसर नियमित स्वच्छ ठेवावा. पक्ष्यांची विष्ठा व कचऱ्याची विल्हेवाट दररोज जाळून किंवा पुरुन टाकावी, बाहेरील इतर वन्यपक्षी व बाहेरील पक्ष्यांना आणू नये. मृत पक्ष्यांना उघड्यावर न टाकता त्याची विल्हेवाट व्यवस्थीत पुरुन करावी. आजारी, मृत पक्ष्यांची माहिती जवळील पशुवैद्यकीय दवाखान्यात द्यावी.
बाजारपेठेत जैवसुरक्षा प्रणालीचा अवलंब करण्यासाठी पुढील बाबींचा अवलंब करावा :
बाजारपेठेत पक्ष्यांना हाताळणारे व त्यांची कत्तल करणाऱ्या व्यक्तींनी हातात ग्लोज व तोंडावर मास्कचा वापर करावा. जीवंत पक्ष्यांच्या बाजारपेठेच्या जागेचे दररोज निर्जंतुकीकरण करावे. आजारी, मृत पक्ष्यांची काळजी व खबरदारी घ्यावी. कुक्कुट पक्ष्यांचे मांस विक्रीची जागा स्वच्छ ठेवावी. या ठिकाणी साठविण्यात येणारे शरीरातील अवयव, पंख इत्यादीचे विल्हेवाट करतांना आवश्यक दक्षता घ्यावी. बाजारपेठेच्या ठिकाणी गटार व निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करावी. पक्षी ठेवण्याचे पिंजरे दररोज स्वच्छ करावेत. अशा ठिकाणी पायदान, फवारणी, हाथ धुणे व इतर स्वच्छतेची व्यवस्था करावी. शासकीय यंत्रणेने अशा ठिकाणाची नियमित तपासणी करावी. पशूपालक, कुक्कुटपालन व्यवसायिक, व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी वरील प्रमाणे जैवसुरक्षा नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही श्रीमती खत्री यांनी केले आहे.