नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :नवापूर येथील बर्ड फ्लू बाधित क्षेत्रात कुक्कुट पक्ष्यांच्या कलिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी, असे निर्देश नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले.
श्री.गमे यांनी बर्ड फ्लू बाधित क्षेत्रातील पोल्ट्री फार्मला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील, तहसीलदार मंदार कुलकर्णी आदी होते.
श्री.गमे म्हणाले, कर्मचाऱ्यांची नीट नोंद ठेवण्यात यावी. दररोज काम सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय पथकामार्फत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार औषधे देण्यात यावी. कलिंगचे काम सुरू असलेल्या परिसरात रुग्णवाहिका तयार ठेवावी. पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी सांगितले.
श्री.गमे यांनी कलिंगच्या कामाची पाहणी केली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. विल्हेवाट लावताना पक्षी आणि अंडी यांची योग्यरितीने नोंद घेण्यात यावी. नवापूर शहराभोवतीत असलेल्या पोल्ट्री फार्ममधील कुक्कुट पक्ष्यांची माहिती घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
श्री.सिंह यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी कलिंग प्रक्रीयेविषयी सूचना दिल्या. यापुढील काळात पोल्ट्री फार्ममधील जैव सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.