नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आर.आर.पाटील सुंदरगाव पुरस्काराचे वितरण मंगळवार 16 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात होणार आहे.
गावांचा शाश्वत विकास घडून आणण्याकरिता पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृद्ध व संपन्न गावाची निर्मिती करण्याच्या दृष्टीने आर.आर. पाटील सुंदरगाव पुरस्कार योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे स्वयमुल्यांकन करुन घेण्यात आले होते व तालुकास्तरीय समिती मार्फत तपासणी करण्यात आली होती.
त्यानुसार प्रत्येक तालुक्यातुन सर्वोच्च गुण प्राप्त ग्रामपंचायतीची आर.आर.पाटील सुंदरगाव म्हणून निवड करण्यात आली. त्यात ग्रामपंचायत कोळदा ता.नंदुरबार, विसरवाडी ता.नवापूर, लोणखेडा ता.शहादा, रोझवे ता.तळोदा, भाबलपूर ता.अक्कलकुवा, खडक्या ता.धडगाव या ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे.
तालुका आर.आर.पाटील सुंदरगाव ग्रामपंचायतीची मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांच्या जिल्हास्तरीय समितीने तपासणी करुन ग्रामपंचायत विसरवाडी ता.नवापूरची निवड केली आहे. या ग्रामपंचायतींना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.