नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नवापूर आणि धडगाव तालुक्यातील गरजू आदिवासी नागरिकांना आदिवासी विभागातर्फे मोफत धान्य वाटप करण्यात आले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार आणि प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नवापुर तालुक्यातील नवागांव येथील 30, आमलाण 28 आणि पाटी बेडकी येथील 16 कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. आमदार शिरीषकुमार नाईक आणि सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला प्रकल्प कार्यालयातील सहा. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई, कार्यालयीन अधिक्षक किरण मोरे, बी. एफ. वसावे, नियोजन अधिकारी राहुल इदे आदी उपस्थित होते.
धडगाव येथे सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली 377 कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झालेल्या भूमीहिन व मजूर आदिवासीना धान्य वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री अॅड़. के.सी.पाड़वी यांच्या उपस्थितीत 1 मे 2020 रोजी करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार शिधापत्रिका नसलेल्या गरजू आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब 10 किलो या प्रमाणे गव्हाचे वाटप करण्यात आले.
आतापर्यंत नंदुरबार व तळोदा प्रकल्प कार्यालयामार्फत एकुण 1500 कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले असून येत्या काळात 2000 कुटुंबांना धान्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शिधापत्रिका नसलेल्या आदिवासी गरजू कुटुंबांनी आपली नावे तहसील कार्यालयामार्फत प्रकल्प कार्यालयात सादर करावे, असे आवाहन आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.