नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’, तर 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नंदुरबार नगर परीषदेमार्फत तयार करण्यात आलेल्या प्रचार रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, उल्हास देवरे, नंदुरबार नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता अभिजित मोहिते, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
‘हर घर तिरंगा’ या अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी होऊन आपले घर, इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवावा. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, सर्व दुकाने, आस्थापनांनी या उपक्रम स्वयंस्फूर्तीने सहभागी होवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी यावेळी केले. या प्रचार रथामार्फत जिंगल्सच्या माध्यमातून तहसिलदार, नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या माध्यमातूनही नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. हे प्रचार रथ नंदुरबार नगर परीषदेतील विविध भागामध्ये जाऊन प्रचार-प्रसिद्धी करणार आहे.