नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय विभाग व सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने आजपासून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार असुन जिल्ह्यात सलग दहा दिवस अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा,नंदुरबार येथे दररोज सकाळी 10 वाजता सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दरम्यान आज सामाजिक समता कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
असा असेल सामाजिक समता कार्यक्रम…
गुरुवार दि.07 एप्रिल रोजी सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येतील.
शुक्रवार दि.08 एप्रिल रोजी जिल्हास्तरावर कार्यक्रम आयोजित करून स्वाधार शिष्यवृत्ती, मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येतील.
शनिवार दि. 09 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात मेळावे किंवा तत्सम उपक्रम तसेच जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने विभागाच्या शैक्षणिक आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जातील.
रविवार दि. 10 एप्रिल रोजी समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहितीबाबत प्रबोधन करण्यात येईल.
सोमवार दि. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात येईल.
मंगळवार दि. 12 एप्रिल रोजी मार्जिन मनी योजनेच्या जनजागृतीबाबत तसेच लाभ मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येतील.
बुधवार दि. 13 एप्रिल रोजी संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.
गुरुवार दि. 14 एप्रिल सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थपनांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम घेतले जातील. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान मेळावा आयोजित करून डॉ. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे व्याख्यान आयोजित केले जाईल. याच दिवशी सर्व जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत राहून, जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने वितरित करतील.
शुक्रवार दि. 15 एप्रिल सहायक आयुक्त कार्यालयात महिला मेळावे आयोजित करून डॉ. बाबासाहेबांच्या महिलांविषयी कार्याची माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येईल.
शनिवार दि. 16 एप्रिल या अंतिम दिवशी, ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ मिळालेल्या व्यक्तिंचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबवून या समता कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल. तरी या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी केले आहे.