नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा शासकीय रुग्णालय येथे मणक्यांवरील शस्त्रक्रीयेसाठी स्पाईन फाऊंडेशनतर्फे सामाजिक दायित्व निधीतून तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रक्रीया कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, स्पाईन फाऊंडेशनचे मुख्य विश्वस्त डॉ.शेखर भोजराज, विश्वस्त डॉ.प्रेमिक नगाड, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेश कोळी आदी उपस्थित होते.
स्पाईन फाऊंडेशनतर्फे या शस्त्रक्रीया कक्षासाठी 45 लाख रुपये खर्च करण्यात आला असून त्यात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा आहेत. मोठ्या शहरात उपलब्ध असणारी मणक्यांच्या ऑपरेशनची सुविधा आता नंदुरबार येथे उपलब्ध होणार असून फाऊंडेशनचे तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मोफत उपलब्ध होणार आहे.
यावेळी लायन्स क्लबचे सचिव डॉ. रविंद्र पाटील, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. सी.डी. महाजन, स्पाईन फाऊंडेशनचे डॉ.तुषार देवरे, गजेंद्र पवल, डॉ.तेजस्वी अग्रवाल, लायन्स सदस्य आदी उपस्थित होते.