नंदुरबार दि.11 : जिल्ह्यातील संचारबंदी आदेश आणि साथ रोग प्रतिबंधक कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल नंदुरबार येथील परवेजभाई करामतभाई खान यांच्याविरुद्ध तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.


परवेज खान यांनी 30 जून 2020 पर्यंत मनाई आदेश लागू असताना सदर आदेशाचा भंग करून मौजे झराळी येथील फार्म हाऊसवर मुलाच्या लग्न समारंभानिमित्त स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास 50 व्यक्तिंची परवानगी असताना  त्यापेक्षा अधिक व्यक्तिंना आमंत्रित करण्यात आले होते. अशाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धेाका असल्याने आणि संसर्गजन्य आजार पसरून मानवी जिवीतास धोका उत्पन्न होण्याची ही कृती असल्याने प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन तहसीलदार थोरात यांनी भारतीय दंड संहितेचे कलम 188, 268, 269, 290, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 54 आणि साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 नुसार हा गुन्हा दाखल केला आहे.


स्नेहभोजन प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भारुड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक नंदुबार यांची संयुक्त समिती नेमण्यात आली होती.
जिल्ह्यात कोविड-19 च्या संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण असल्याने संचारबंदीत शिथीलता देण्यात आली आहे. त्याचा उपयोग केवळ अत्यावश्यक बाबींसाठी नागरिकांनी करावा. कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात होणार नाही यासाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. लग्न समारंभात 50 पेक्षा अधिक व्यक्तिंना आमंत्रित करू नये. रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीत घराबाहेर अनावश्यक फिरू नये. बाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क घालावा आणि शारिरीक अंतराचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.