नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 29: जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांसोबत स्थानिक लोकप्रतिनिधींचा सहभाग, युनिसेफचे सहकार्य, स्थानिक जि.प. व आरोग्य कर्मचारी आणि शिक्षकांचे परिश्रम यामुळे अक्कलकुवा तालुक्यात आयोजित करण्यात येणाऱ्या कोरोना लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. जामली येथे झालेल्या शिबिरात एकाच दिवसात 545 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
तालुक्यात यापूर्वीदेखील काठी, मोलगी आणि भगदरी येथील शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. पालकमंत्री ॲड.के.सी. पाडवी यांनी आढावा बैठकीत तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे याबाबत अभिनंदनदेखील केले होते. तालुक्यातील शासकीय यंत्रणेने आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवले असून नियोजनबद्धरितीने शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
जामली येथे सरपंच इमाबाई तडवी यांच्या उपस्थित शिबिर नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. जामली आणि सल्लीबार गावात स्थानिक भाषेतून जनजागृती करण्यात आली. शिक्षण, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्तींनी प्रत्येक पाड्यात जावून लसीकरणाचे महत्व सांगितले आणि लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्या. लाभार्थ्यांना शिबिरस्थळापर्यंत आणण्यासाठी व परत सोडण्यासाठी रुग्णवाहिका आणि स्कूलबसची सुविधा करण्यात आली होती.
स्वत: सरपंच तडवी यांनी सर्वप्रथम लस घेतली. 95 वर्षाच्या इंदिराबाई पाडवी यांनीदेखील लसीची पहिली मात्रा घेतली. त्यांचा सरपंचांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. युनिसेफ प्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी विविध कक्षाद्वारे शिबिराचे चांगले नियोजन केल्याने मोठ्या प्रमाणत लसीकरण झाले.
शिबिराला डॉ.भिमसिंग पाडवी, सरपंच इमाबाई तडवी, सामाजिक कार्यकर्ते भरत तडवी, युनिसेफ तालुका समन्वयत जितेंद्र वळवी, ग्रामसेवक भरत बिऱ्हाडे, केंद्र प्रमुख बकाराम गावीत, माजी सरपंच सोन्या वसावे आदी उपस्थित होते.
वडफळी येथेदेखील चांगला प्रतिसाद
अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी येथे आयोजित शिबिरात दुपारपर्यंत 200 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी जि.प. सभापती निर्मलाताई राऊत, तहसिलदार रामजी राठोड, गट विकास अधिकारी नंदकुमार सुर्यवंशी, माजी जि.प.सदस्य सीताराम राऊत, पं.स.सदस्य आपसिंग वसावे, वैद्यकीय अधिकारी प्रशांत बडगुजर, उपसरपंच दिलीप राऊत आदी उपस्थित होते.
धडगावच्या दुर्गम भागात पोहोचले पथक
धडगाव तालुक्यातील केलवाणीपाडा येथील घाट ओलांडून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वाहवाणी गावात प्रतिकूल परिस्थिती असतानादेखील आरोग्य पथकाने लसीकरण शिबीर घेतले. या गावात 50 नागरिकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली.
गावात मोबाईल नेटवर्क नसल्याने दोन किमी अंतरावर नोंदणीची सुविधा करण्यात आली. दमण्या वळवी या शिक्षकाने गृहभेटीच्या माध्यमातून लसीकरण जनजागृती केली. वैद्यकीय पथकाने लसीकरणापूर्वी लसीकणाचे महत्व नागरिकांना समजावून सांगितले.
दुर्गम आणि नर्मदा काठावरील धडगाव तालुक्यातील शेवटचे गाव पौला या ठिकाणीदेखील लसीकरण शिबीर घेण्यात येऊन 31 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. डॉ. दिनेश वळवी, डॉ. कल्पेश मोरे, श्रीमती सुतार सिस्टर, श्री. वळवी, केंद्र प्रमुख पी. बी. पाटील, देवीसिंग वळवी, दिनेश पाडवी, विकास नाईक पोलीस पाटील देवजी तडवी आदी यावेळी उपस्थित होते. मदतनीस उपस्थित होते व नागरिकांचे प्रबोधन केले. याच ठिकाणी अटवीपाडाच्या 10 नागरिकांचेदेखील लसीकरण करण्यात आले.