नंदुरबार (प्रतिनिधी):-  कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर जारी झालेल्या लॉकडाऊनमुळे नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सुमारे एक हजार छायाचित्रकार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हातावर पोट असल्याप्रमाणे छायाचित्रकारांना देखील चिंता सतावत आहे.मार्च ते जून महिन्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर लग्न सोहळे आणि सार्वजनिक व घरगुती समारंभांचा हंगाम असतो. मात्र यंदा कोरोना मुळे या हंगामा वरील संकट अधिक गडद झाले आहे. छायाचित्रणा बरोबरच एडिटर, ग्राफिक डिझाईनर, फोटो एडिटर, एक्सपोजिंग त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.  नंदुरबार शहर तथा जिल्ह्यात सुमारे एक हजारावर व्यावसायिक छायाचित्रकार आहेत. यात अनेक व्यवसायिकांनी लाखो रुपये गुंतवणूक करून कॅमेरे, संगणक, ड्रोन आणि स्टुडिओ उभारले आहेत. याशिवाय यातून अनेकांना रोजगार मिळत होता. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर हौशी छायाचित्रकार आहेत. किंबहुना फोटोग्राफी हेच त्यांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. नंदुरबारसह शहादा, तळोदा, धडगाव, अक्कलकुवा, मोलगी आणि नवापूर येथील सर्वच छायाचित्रकारांचे कामकाज सध्या बंद पडले आहे. दरवर्षी मार्च ते जून दरम्यान मोठ्या प्रमाणावर लग्नसमारंभाच्या ऑर्डर नोंदणी असल्याने सर्व छायाचित्रकारांनी नियोजन केले होते. परंतु कोरोना पार्श्वभूमीवर विवाह सोहळे रद्दचा फतवा शासनाने काढला. त्यापाठोपाठ देशभर जारी झालेल्या लॉकडाऊन नंतर संकटात आणखीनच भर पडली. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील छायाचित्रकारांची आर्थिक कोंडी झाली. यंदाचा हंगाम गेला तरी छायाचित्रणासाठी दिवाळीनंतर येणाऱ्या लग्नसराई हंगामापर्यंत अडचणींचा सामना करावा लागणार आहे.                                 

सोशल मीडिया आणि मोबाईलच्या जमान्यात फोटोग्राफी हरवत चालली आहे. यामुळे महागडी गुंतवणूक करून देखील फोटो स्टुडिओ चालविणे कठीण झाले आहे. संचारबंदी असल्यामुळे दुकाने देखील बंद असून साखरपुडा, लग्न, वाढदिवस, ग्रहशांती यासारखे कार्यक्रम पुढे ढकलल्याने नोंदणी झालेल्या ऑर्डर रद्द होऊ लागल्या आहेत. इतरांप्रमाणे राज्य शासनाने व्यवसायिक छायाचित्रकारांना मदतीचा हात देण्याची मागणी नंदुरबार जिल्हा व्यावसायिक फोटोग्राफर संघटना आणि नंदुरबार जिल्हा वृत्तपत्र छायाचित्रकार संघटना यांनी केली आहे.