नंदुरबार  (जिमाका वृत्तसेवा) :  भारतीय स्वांतत्र्याला पुढील वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त केंद्र सरकार व राज्य शासनाच्या निर्देश, संकल्पनेनुसार हा महोत्सव लोकसहभागातून साजरा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी दिल्या.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुबे, अमृत महोत्सव समितीचे समन्वयक तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार उल्हास देवरे, गिरीश वखारे (तळोदा), भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील  सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अमृत महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने कृती  आराखडा तत्काळ सादर करावा. अमृत महोत्सवाचा कृती आराखडा सादर करताना प्रामुख्याने भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, नावीण्यपूर्ण संकल्पना, स्वांतत्र्योत्तर फलनिष्पती, नवे संकल्प, अंमलबजावणी या पाच मुद्दयावर कार्यक्रम व उपक्रमावर आधारीत असावा.

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त स्थानिक, युवा, विद्यार्थी, खासगी संस्था, लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आणि सहभागाने उत्साहाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयेाजन करावे. प्रत्येक विभाग व नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आदींच्या मदतीने रॅली, सायकल मोर्चा, चित्रकला स्पर्धा,  पथनाट्याचे आयोजन करावे. त्यामध्ये व्यसनमुक्ती भारत ,वारसास्थळे, पदयात्रा, भारतीय स्वातत्र्यांशी निगडित महत्वाच्या ठिकाणांची स्वच्छता, डागडुजी, रंगरंगोटी , रक्तदान शिबिर, श्रमदान, वृक्ष लागवड, वनराई बंधारा असे उपक्रम राबवावेत. स्वांतत्र्याशी निगडित महत्वाची ठिकाणे निवडून त्याठिकाणी कार्यक्रमाचे आयेाजन करावे. त्या स्थळांची माहिती द्यावी.

नगरपालिका, नगरपंचायतींने आपापल्या कार्यक्षेत्रातील  स्वांतत्र्यांशी संबंधित स्थळांची, पुतळ्यांची डागडुजी व रंगरंगोटी करावी. सर्व विभागांनी प्रदर्शने, हेरिटेज वॉक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयेाजन करावे. जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मासिक बैठकीत अमृत महोत्सवी भारत याबाबत माहिती द्यावी. प्रत्येक विभागाने शासकीय पत्रव्यवहारांमध्ये अमृत महोत्सवांच्या लोगोचा वापर करावा, अशाही सूचना यावेळी दिल्या. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.