नंदुरबार : जिल्ह्यात नगरपालिका क्षेत्रातील व अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रातील आस्थापना व दुकाने लॉकडाऊन कालावधीत अर्थात 17 मे 2020 पर्यंत सकाळी 7 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आदेशित केले आहे.

लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय सेवा, मेडीकल, भाजीपाला, किरणा दुकाने व दुध विक्रेते यांची दुकाने त्यांच्या परवाना परवानगीनुसार पूर्णवेळ सुरू राहतील. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आस्थापना व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत त्यांच्या परवाना परवानगीनुसार सुरू राहतील. प्रतिबंधीत क्षेत्र घोषित झाल्यानंतर त्या क्षेत्राचे नियम लागू राहतील. कुठल्याही कार्यालयास वेळेत बदल करण्याचा अधिकार असणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांना या आदेशामुळे आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे. नागरिकांनी दुकानाच्या ठिकाणी गर्दी करू नये. दुकानात जाताना व खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे व चेहऱ्यावर मास्कचा वापर करावा. दुकाने व आस्थापनांनी देखील कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करावे व सॅनिटायझरची सुविधा करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.