दोन तोतया पोलिसांनी सव्वा लाखाचे दागिने लांबविले
नंदुरबार (जगदीश ठाकुर)-
क्राईम ब्रँचचे पोलिस असल्याचे सांगून दोन तोतया पोलिसांनी एका महिलेकडील कापडी पर्स हातचलाखीने लांबवून सुमारे सव्वा लाखाचे दागिने चोरुन नेले. या दोघांनी हिंदी भाषेत संवाद साधून महिलेला गंडविले आहे. याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
नंदुरबार येथील वेडूगोविंद नगरात राहणारी हेमलता मगनलाल जयस्वाल ही महिला कापडी पर्समध्ये दागिने घेवून जात होती. यावेळी शहरातील भगवा चौक परिसरात रेल्वे पटरीजवळ दोन अज्ञातांनी तिच्या जवळ येवून आम्ही क्राईम ब्रॉचचे पोलीस असल्याचे सांगितले. तसेच सदर महिलेची नजर चुकवून कापडी पर्स हातचलाखीने चोरुन नेली. यात तब्बल सव्वा लाख रुपयांचे दागिने होते. चोरट्यांनी महिलेशी हिंदी भाषेत संवाद साधला होता. घटनास्थळी उपनगरचे पोलीस निरीक्षक भापकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी भेट दिली. याबाबत हेमलता जयस्वाल या महिलेने नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर करीत आहेत.