मुंबई, दि. 29 : लोकगीतांमधून समाजाला आवाहन करण्याची ताकद लक्षात घेऊन लोकशाही, मताधिकार यासाठी त्याचा पुरेपूर वापर व्हावा, यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत राज्यातील नागरिकांनी एकल किंवा समूहाने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
ही स्पर्धा 26 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत मतदार यादीत नाव नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यास नाव वगळणे, विविध घटकांना (दिव्यांग, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक) दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा, हे विषय केंद्रस्थानी ठेवून गीतरचना करता येईल. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे; पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर गीतरचना करून लोकशाहीसंबधी जागृती करता येईल.
स्त्रियांच्या गीतात सासर-माहेरचे उल्लेख असतात. लोकगीतांमधले माहेर गोड असते, जिथे खायला मिळते तर सासर द्वाड असते, जे कोंडून मारते. सासर-माहेरच्या जागी लोकशाही-हुकूमशाही यांची प्रतिकात्मक रचना करायला आणि त्यांचे विशेष सांगायला खूपच वाव आहे. लोकगीतांच्या अंगभूत लवचिक स्वरूपामुळे त्यामध्ये आधुनिक स्त्रीचे मानस गुंफणेही सहज शक्य आहे. आणि हे मानस गुंफताना तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाबरोबरीनेच तिने आपल्या मताधिकाराबाबत जागृत कसे व्हावे, हे सांगता येईल. लोकगीतांतील स्त्रीपेक्षा आजची स्त्री स्वतंत्र व्यक्तिमत्वाची आहे, निर्णयक्षम आहे; हे लक्षात घेऊन तिने आपला लोकप्रतिनिधीही स्वनिर्णयाने, लोकशाही मूल्यांना प्रमाण मानून गावाच्या-देशाच्या विकासाला प्राधान्य देणारा निवडावा, असे लोकगीतातून आवाहन करता येईल.
समूह आणि एकल गटांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार असून आकर्षक रकमांची बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. समूह गटासाठी प्रथम क्रमांक एकवीस हजार रुपये, द्वितीय क्रमांक अकरा हजार रुपये, तृतीय क्रमांक पाच हजार रुपये आणि उत्तेजनार्थ एक हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे आहेत. तर एकल गटासाठी प्रथम क्रमांक सात हजार रुपये, द्वितीय क्रमांक पाच हजार रुपये, तृतीय क्रमांक तीन हजार रुपये आणि उत्तेजनार्थ पाचशे रुपयांची एकूण दहा बक्षिसे आहेत.
स्पर्धेची अधिक माहिती व नियमावली मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdftPE0wYpJLnuwGlhk7-VPRVC9I4sSq9yUgHJPTGsZxuHdYQ/viewform या लिंकवर उपलब्ध आहे.