नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सुरू असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत अन्न व औषध प्रशासनामार्फत ‘अन्न सुरक्षा सप्ताह साजरा’ करण्यात येत आहे. यानिमित्ताने आज अन्न व औषध प्रशासन,नंदुरबार आणि शेठ व्ही.के.शाह विद्यालय,शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथे कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे,अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, माजी जि.प.सदस्य अभिजित पाटील, मुख्याध्यापक श्री.भोई, शहादा व्यापारी संघाचे मनोज जैन तसेच विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री.कांबळे यांनी विद्यार्थ्यांना जंक फुडचे दुष्परिणाम तसेच आहारात कमी तेल, कमी मीठ तसेच साखरेचे प्रमाण कमी ठेवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी प्रभात फेरीचे आयोजन देखील करण्यात आले होते. ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत अन्न व औषध प्रशासनामार्फत 5 ते 12 ऑगस्ट 2022 पर्यंत ‘अन्न सुरक्षा सप्ताह साजरा’ करण्यात येत आहे. या सप्ताहनिमित्त ‘सुरक्षित आहार देई आरोग्याला आधार’ हा संदेश घरोघरी पोहोचविला जाणार असून अन्न व्यवसायिक तसेच सामान्य नागरिकांसाठी अन्न सुरक्षा व मानके कायद्याबाबत जनजागृतीसाठी जिल्हास्तरावर विविध शिबिर, कार्यशाळा, व्यसनमुक्तीची शपथ, कमी तेल, मीठ, साखरेतील पाककृती स्पर्धा, तसेच प्रचार साहित्याच्या माध्यमातून अन्न व्यावसायिकांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.