नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सव राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांचा आढावा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे यंदा पूर्ण होत असून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 9 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’निमित्त विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा, तालुका आणि ग्रामपातळीवर विविध उपक्रम राबविण्यात येतील. त्यांचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे.
या महोत्सवांतर्गत जिल्हास्तरावर सर्व हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण करण्यात येईल. नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभा होतील. जिल्ह्यातील अनामवीर, स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांची दुर्मिळ छायाचित्रे व त्यांच्या कार्याची माहिती गावात देण्यात येईल. स्वातंत्र्यकालिन माहिती, ऐतिहासिक ठिकाणांची माहिती संकलित करण्यात येईल. स्वातंत्र्य दिनी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येईल. या फेरीत आबालवृद्धांना सहभागी करून घेण्यात येईल.
जिल्ह्याच्या मुख्यालयी 75 फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येईल. याशिवाय स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक संचलन करतील. शालेय, महाविद्यालयस्तरावर निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा घेण्यात येतील. जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी पदयात्रा काढण्यात येईल. याच महोत्सवाचा एक भाग म्हणून आजादी का अमृत महोत्सव ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येईल. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. जिल्ह्यातील पुरातत्वदृष्ट्या महत्वाच्या वारसास्थळांच्या स्वच्छतेसाठी मोहीम राबविण्यात येईल. संविधानस्तंभाची उभारणी, जिल्ह्याच्या मुख्यालयी शासनमान्य लामण दिवा लावणे आदी उपक्रम राबविण्यात येतील. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली विविध उपक्रम राबविण्यात येतील. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभा, शासकीय कार्यालयांमध्ये वृक्षारोपण मोहीम, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. या सर्व उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील, असे नियोजन सर्व विभागांनी करावे, असेही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले.