नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): शाळेत दाखल होण्यास पात्र शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करणे तसेच बालकांची शाळेतील गळती शून्यावर आणण्यासाठी 5 जुलै ते 20 जुलै,2022 या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ मोहिम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी कृष्णा राठोड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जगराम भटकर, आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री म्हणाल्या की, बालकांना मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे. त्यामुळे 5 जुलै ते 20 जुलै,2022 या कालावधीत ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शाळेत दाखल होण्यास पात्र शाळाबाह्य बालकांचा शोध घेताना ग्रामपंचायत, नगरपरिषद, जन्म मृत्यू अभिलेख्यामधील नोंदी, कुटुंब सर्वेक्षण, तात्पुरते स्थलांतरित कुटुंबात असणाऱ्या बालकांची माहिती, शाळाबाह्य, अनियमित बालकांची माहिती घ्यावी. जिल्हातील सर्व खेडी, वस्ती, वाडी, गाव, वार्ड वास्तव्य करणाऱ्या शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करावे. यासाठी गाव पातळीवर मासिक सभा, ग्रामसभा, शाळा व्यवस्थापन समितीने सभा घ्याव्यात. मिशन झिरो ड्रॉपआऊटची प्रसारमाध्यमातून प्रचार व प्रसिद्धी करावी.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक), जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास), बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण व नागरी) यांच्याकडून गाव. केंद्र, बीट, विभाग व शाळास्तरानुसार नियोजन करण्यात करावे. महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग व स्वंयसेवी संस्थांच्या समन्वयाने ही मोहीम यशस्वी राबवून या अभियानात एकही बालक शाळाबाह्य, स्थलांतरित बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी,असे त्यांनी सांगितले. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.