नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महिला व बाल विकास विभागामार्फत शुभमंगल सामूहीक विवाह योजना राबविण्यात येत असून खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय तसेच नोंदणीकृत स्वंयसेवी संस्थांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा माहिती व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या विशेष पॅकेज मधून जिल्ह्यातील नोंदणीकृत स्वंयसेवी संस्थामार्फत सामूहिक विवाह योजना राबविण्यात येणार असून विवाह करणाऱ्या जोडप्यास 10 हजार व संस्थेस एका जोडप्यामागे 2 हजार अनुदान देण्यात येणार आहे. संस्थेने योजना राबवितांना कमीत कमी 5 वधू- वरांचा गट करणे आवश्यक राहील. तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासवर्गीय दाम्पत्यांनाही या योजनेद्वारे 10 हजार रुपये लाभ देण्यात येईल.
नोंदणीकृत संस्था, तसेच नोंदणीकृत विवाह करणाऱ्या खुले प्रवर्ग व इतर मागासगर्वीय दाम्पत्यांनी अधिक माहितीसाठी तसेच विहीत नमुन्यातील अर्जासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला,कक्ष क्र.226, टोकरतलाव रोड नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210047) वर संपर्क साधावा.