नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुका व गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा. नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना कामकाजाची माहिती द्यावी. अशा सूचना जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या आहेत.
जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाने कळविल्यानुसार, येत्या मान्सून काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तालुका व गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावे, यासाठी इतर विभागातील कर्मचारी उपलब्ध करुन नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना कक्षातील कामकाजाची माहिती देऊन कक्षात हजेरीपट, संदेश नोंदवही, पर्जन्यमान नोंदवही अद्यावत ठेवण्यात यावी.
यंत्रणेने मान्सूनपूर्व कालावधीत नदीकाठची अतिक्रमणे काढण्यात यावीत, ज्यामुळे पावसाळ्यात नदी प्रवाहास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. यासोबतच दरड कोसळणारी ठिकाणे व पूर प्रवण क्षेत्र निश्चित करण्यात येवून या गावांसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी बोटी, होड्या, लाईफ जॅकेट, रिंग, टॉर्च, जनरेटर, पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था व निवाऱ्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. पर्जन्यमापक यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री करुन आवश्यकता असल्यास यंत्रे तात्काळ दुरुस्ती करावी.
धरण निहाय संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्त करावी, दैनदिन पाणीसाठा, पाण्याचा विसर्ग, पर्जन्यमान इत्यादीचा दैनदिन अहवाल जिल्हा नियंत्रण कक्षास पाठवावा. तालुकास्तरावर घाट सेक्शनच्या ठिकाणी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर झाडे, दरड पडुन वाहतूक विस्कळीत होणार नाही यासाठी पुर्वतयारी म्हणून संबंधित विभागांकडून जेसीबी, मजूर, चैन सॉ कटर, टॉर्च, जनरेटरची पर्यायी व्यवस्था तयार करुन ठेवावी. पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये रेशनचे धान्य उपलब्ध करुन द्यावे. नादुरूस्त रस्ते, पूल, विद्युत व दूरसंचार यंत्रणा, शाळा इमारती, धरणे, कालवे आदी सुस्थितीत असल्याबाबत खात्री करण्यात यावी.
धरणातील विसर्ग, नद्यांची पाणी पातळी व पडणारा पाऊस यांचा अंदाज घेऊन सखल भागातील नागरिकांना रात्री अपरात्री पूर्वसूचना देण्यासाठी गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांची मदत घ्यावी. त्याचप्रमाणे दवाखाने, शोध व बचाव साहित्य यासारखे आवश्यक साहित्य तसेच प्रशिक्षित पोहणाऱ्या व्यक्तींची पूर क्षेत्रात योग्यवेळी मदत मिळेल याचा आराखडा तयार करण्यात येवून यंत्रणेने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्षा मनीषा खत्री यानी दिल्या आहेत.