नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मोदलपाडा येथे उभारण्यात आलेल्या नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमुळे परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून या भागातील आरोग्याच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.
तळोदा तालुक्यातील मोदलपाडा (सतोना ) येथील नूतन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी तसेच भव्य दंत व सर्व रोग निदान शिबीर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, शिक्षण व आरोग्य सभापती अजितदादा नाईक, कृषि व पशुसवंर्धन सभापती गणेशदादा पराडके, पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, पंचायत समिती उपसभापती लता वळवी, जि.प.सदस्य सुहास नाईक, सी.के.पाडवी, प्रताप वसावे, जितेंद्र पाडवी, मोहनदास शेवाळे, प्रकल्पस्तरीय समिती अध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, या आरोग्य केंद्राच्या लगत 3 उपकेंद्र व 22 गावे जोडलेली असल्याने परिसरातील नागरिकांना याचा चांगला लाभ होईल. प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्यासंदर्भात पाठपुरावा करावा. यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. सिकलसेल हा अनुवंशिक आजार असून हा आजार रोखण्यासाठी आदिवासी समाजातील लग्न पद्धतीत बदल करणे काळाजी गरज आहे. यासाठी सामाजिक, राजकीय व्यक्तिंनी बैठका घ्याव्यात. त्यासाठी नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी. सिकलसेल निमुर्लनासाठी यंदाच्या बजेट मध्ये 2 कोटीची तरतूद केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या आरोग्य केंद्राची इमारत सुसज्ज असून सर्व सोईसुविधा येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. येथील सुविधांचा उपयोग नागरिकांनी करुन घ्यावा. जिल्ह्यासाठी एमआरआय मशिन खरेदीसाठी मंजूरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आरोग्य केंद्रासाठी 2 एकर जमीन देणाऱ्या राहुल खाटीक व त्यांच्या कुटूंबाचा सत्कार पालकमंत्र्यांनी केला.
कोरोना लस घेण्याचे आवाहन
कोविडचे संकट अद्यापही पूर्णपणे गेले नसल्याने नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. नागरिकांनी या आजाराचे दुष्परिणाम लक्षात घेऊन अद्याप ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी लसीकरण करून घ्यावे. तसेच ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असेल त्यांनी दुसरा डोस घेण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी यावेळी जिल्हावासियांना केले.
ॲड. सीमा वळवी म्हणाल्या, मोदलपाडा सारख्या ग्रामीण भागात सुसज्ज इमारत उभी करण्यात आली आहे. आरोग्य केंद्रामुळे महिला आणि बालकांवर तसेच परिसरातील नागरिकांवर तातडीने उपचार करणे सोयीचे होईल. येथे आज आरोग्य केंद्राचे उद्घाटन व त्याच निमित्ताने आरोग्य शिबिराचे सुध्दा आयोजन केले ही खुप चांगली गोष्ट असून पहिल्याच दिवशी आपण मोठ्या प्रमाणात रुग्णांना चांगली सेवा देत असून या शिबीराच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मोफत उपचार होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याआधी सोमावल प्राथमिक आरोग्य केंन्द्राला येथील काही गावे जोडली गेली होती त्यामुळे सोमावल प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या सेवेवर जास्त भार येत होता. आता या आरोग्य केंद्रामुळे सोमावल आरोग्य केंद्रावरील भार काही अंशी कमी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार राजेश पाडवी म्हणाले, प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र गुजरात लगत असल्याने गुजरात राज्यातील सीमावर्ती तसेच गावालगत मुख्य रस्त्यामुळे होणारे अपघाताचे प्रमाण लक्षात घेता या भागातील नागरिकांना या ठिकाणी वेळेत चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होईल. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी येथे उपलब्ध असलेल्या विविध सुविधांच्या माध्यमातून येथील परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.चौधरी यांनी आरोग्य केंद्राची माहिती दिली. या इमारतीवर 5 कोटी 21 लाख 74 हजार इतका खर्च झाला असून कर्मचारी निवासस्थानासह, पॅथोलॉजी लॅब, शस्त्रक्रीया कक्ष, शवविच्छेदन गृह, औषध भांडार, महिला व पुरुष वार्ड आदी सुविधा येथे उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी गावातील व परिसरातील नागरिक तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.