नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : अन्न पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी ग्राहकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी अन्न्ा सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत सनियंत्रण समितीची बैठकीत दिल्या. बैठकीस अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, शिक्षणाधिकारी चंद्रकांत पाटील, जिल्हा उद्योग केंन्द्राचे उद्योग अधिकारी दिलीप पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, अन्न पदार्थामध्ये भेसळ कशी ओळखावी यासाठी संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती मोहिम राबवावी. परवाना नोंदणी मोहिम कार्यक्रमाचे आयोजन करावे. जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ व दर्जेदार मालाचा पुरवठा करण्यासाठी अन्न सुरक्षा कायद्यानुसार दिलेल्या मानांकनानुसार वेळोवेळी अन्न आस्थापनाची तपासणी करावी. ग्राहकांना शुद्ध व दर्जेदार अन्न पदार्थ मिळण्यासाठी यंत्रणेने काम करावे.
प्रास्ताविकेत अन्न सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी मागील वर्षात अन्न आस्थापनांची तपासणी करुन 26 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात जास्तीत जास्त आस्थापनांची तपासणी करुन अन्न भेसळ करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी समितीच्या सदस्याचे कार्य विषद केले.