नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र शासनाच्या वनबंधु कल्याण योजनेंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांच्या कार्यक्षेत्रातील अक्राणी तालुक्यातील विद्युतीकरण न झालेल्या गाव, पाड्यांमध्ये घरासाठी सोलर होम लाईट सिस्टम पुरवठा करण्यासाठी पात्र अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून 13 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
यासाठी लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासोबत रहिवास दाखला, आधार कार्ड, ग्रामसभेचा ठराव, आधार संलग्न बँक खाते क्रमांक, उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, घराचे विद्युतीकरण झाले नसल्याबाबत ग्रामसभाचा ठराव, यापुर्वी इतर शासकीय योजनामधुन लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र, 8 अ उतारा, शासकीय सेवेत नसल्याचा दाखला आवश्यक राहील. या योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नंदुरबार यांनी अक्राणी तालुक्यातील विद्युतीकरण न झालेल्या गाव, पाड्यांची यादी सादर केल्यानुसार तेथील पात्र लाभार्थ्यांना सोलर होम लाईट सिस्टम (500 व्हॅट सोलर पॅनल मॉडेल 250*2, जीआय स्टॅअचर, 150 AH 12 व्हॅट सोलर टयूबलर बॅटरी, 1 के.व्ही. सोलर इनर्व्हटर, टयुब लाईट 20 व्हॅट, सिलींग फॅन 36 व्हॅट,(एक नग), टी.व्ही / मोबाईल चार्जिंग सॉकेट ) देणे प्रस्तावित आहे. विद्युतीकरण न झालेल्या गाव, पाड्यांची यादी प्रकल्प कार्यालय,तळोदा तसेच पंचायत समिती, अक्राणी येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
योजनेचे अर्ज 30 मार्च 2022 पासून उपलब्ध असून अधिक माहितीसाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,शासकीय दुध डेअरीच्या मागे,शहादा रोड, तळोदा जि.नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.