नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : पाण्याचा साठा मर्यादित आहे. आता उन्हाळा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा. त्यासाठी जलसंपदा विभागाने नागरिकांमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर याविषयी जनजागृती करावी, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी केले.
पंचायत समितीच्या सभागृहात आज जलजागृती सप्ताहाचा समारोप कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, नर्मदा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता संजय खैरनार, जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता नीलिमा मंडपे, भूजल सर्व्हेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक रमेश बगमार, उप कार्यकारी अभियंता मीनल वाघ, गट विकास अधिकारी महेश वळवी आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, राज्यातील वापरायोग्य उपलब्ध पाण्यापैकी साधारण 85 ते 86 टक्के पाणी सिंचनासाठी वापरले जाते. उर्वरित पाणी बिगर सिंचनासाठी म्हणजे मुख्यत्वेकरुन पिण्यासाठी व उद्योगासाठी वापरले जाते. वाढते शहरीकरण, लोकसंख्येची पाण्याची गरज तसेच वाढते औद्योगिकीकरण व त्याची निकड लक्षात घेता पाण्याची मागणी वाढणार आहे, अशा परिस्थितींमध्ये सिंचन व्यवस्थापनाचा मागोवा घेऊन व त्याद्वारे भविष्यातील पाण्याच्या सर्व गरजा कुठल्याही संघर्ष न होता कार्यक्षमपणे कशा भागविल्या जातील याकडे सर्व यंत्रणांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
श्री.पवार म्हणाले की, दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो.या सप्ताहाच्या निमित्ताने पाणी बचतीचे महत्व पाणी संवर्धन करताना भूगर्भामध्ये पाण्याची पातळी कशी वाढेल याबाबत समाजामध्ये व जनतेमध्ये जनजागृती करावी.
श्री. खैरनार म्हणाले की, राज्यातील पाणी नियोजन व पाण्याबद्दल जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने 16 मार्च ते 22 मार्च या कालावधीत राज्यभर जल जागृती सप्ताह साजरा करण्यात येतो. या सप्ताहात जनतेमध्ये पाण्याची उपलब्धता, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे व पाण्याबाबत शासनाची धोरणे इत्यादीबाबत जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी या जलसप्ताहाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जलसंपदा विभागातर्फे जलसंवर्धनासाठी शहरात जलदौडचे आयोजन करण्यात आले होते. या जलदौडमध्ये विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेवून जलदौड रॅलीत पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा, जीवन वाचवा, जल हे तो कल है, जल संरक्षण, धरती का रक्षण, पाऊस आला मोठा, पाण्याचा केला साठा हे घोषवाक्य सादर करीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरापासून सुरु करण्यात येवून पंचायत समिती येथे समारोप करण्यात आला.
जलसप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्याभरात राबविलेल्या विविध उपक्रमाचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले.यावेळी श्री.पाटील यांच्या हस्ते जल प्रतिज्ञाचे सामूहिक वाचन करण्यात आले. कनिष्ठ अभियंता श्रीमती. गावीत यांनी ‘पाणी अमृताचे धार’ या कविताचे वाचनही करण्यात आले. श्रीमती. साबळे यांनी आभार प्रदर्शन तर सूत्रसंचलन शाखा अभियंता विजय जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नर्मदा विकास विभाग तसेच नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक,नंदुरबार येथील उपअभियंता,कनिष्ठ अभियंता,सहायक अभियंता तसेच कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.