नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे सन 2021-2022 या आर्थिक वर्षांसाठी भटक्या जमाती- क प्रवर्गातील धनगर समाजातील व्यक्तींनी वैयक्तिक घरकुलाचे प्रस्ताव 30 डिसेंबर 2021 पर्यंत गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंब हे विमुक्त जाती , भटक्या जमाती या मूळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करुन उपजिविका करणारे असावे, लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असावे, लाभार्थ्यांकडे कुटुंबाचे स्वत:च्या मालकीचे घर नसावे, लाभार्थी कुटुंबाचे घर हे झोपडी, कच्चे घर असावे. लाभार्थी कुटुंब हे भूमीहिन असावे. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. लाभार्थ्याच्या कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात कोठेही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. योजनेचा लाभ पात्र कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल. लाभार्थी हा वर्षभरात 6 महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.
योजनेच्या अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.