नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी जिल्हा रुग्णालयात म्युकर मायकोसिस रुग्णांच्या उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला.
ॲड.पाडवी यांनी आस्थेवाईकपणे रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आता बरे वाटते ना, चिंता करू नका तुम्ही लवकरच बरे व्हाल, अवयव वाचला हे महत्वाचे लवकर ठणठणीत व्हाल अशा शब्दात पालकमंत्र्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक रुग्णाच्या उपचाराबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली.
म्यूकर मायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधे अधिक प्रमाणात मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. रुग्णांना चांगले उपचार मिळण्यासाठी आवश्यक सुविधा देण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना केल्या.
यावेळी खासदार डॉ. हिना गावीत, जि. प.अध्यक्ष सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, डॉ.राजेश वसावे आदी उपस्थित होते.