नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : धडगाव तालुक्यात नर्मदाकाठच्या गावांना तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बोटीने सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अन्नधान्य वाटप करण्यात आले.
शुक्रवारी नर्मदा काठावरील उडद्या, भादल आणि भाबरी या तीन गावांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत मे महिन्याचे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे प्रती व्यक्ती 5 किलो धान्य आणि राज्य शासनातर्फे नियमित धान्यदेखील मोफत वितरीत करण्यात आले.
तीन्ही गावांचे एकूण 100 क्विंटल गहू, 100 क्विंटल तांदूळ आणि 2.23 क्विंटल चना आदल्या दिवशीच गावात पोहोचविण्यात आले होते. बोटीच्या सहाय्याने विविध पाड्यांवर पुरवठा निरीक्षक हितेश ढाले आणि मंडळ अधिकारी संदीप वळवी यांच्या उपस्थितीत हे धान्य वितरीत करण्यात आले. यावेळी स्वस्त धान्य दुकानदार अंबालाल पावरा, फुलसिंग पावरा आणि शिवराम पावरा उपस्थित होते.