नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘कोरोनामुक्त गाव’ मोहिम राबवावी आणि कोरोना बाधित आढळलेल्या गावात मोहिम स्तरावर आरटीपीसीआर चाचणी आणि लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी  दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयत आयोजित जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, उपजिल्हाधिकारी  बबन काकडे,  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी धर्मेंद्र जैन आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात एका पथकाद्वारे किमान 200 आरटीपीसीआर चाचण्या करण्यात याव्यात. कोरोना बाधित आढळणाऱ्या गावातील सर्व नागरिकांची  स्वॅब नमुने संकलीत करण्यात यावे. प्रत्येक कोरोना बाधित संस्थात्मक अलगीकरणात राहील याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या 50 पर्यंत खाली आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.

लसीकरणासाठी दररोज 16 गावात शिबिराबाबत आवश्यक नियोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, व्यावसायिकांची रॅपीड अँटीजन चाचणी करण्यासाठी विशेष मोहिम सुरू करावी. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात  लसीकरण मोहिमेला वेग द्यावा. या दोन्ही तालुक्यात ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा उपयोग करून रुग्णांवर त्याच ठिकाणी उपचार करावे.

यावेळी संस्थात्मक अलगीकरण, ऑक्सिजन खाटांची उपलब्धता, ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी, लसीकरण शिबिरांचे आयोजन, कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.