नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा‍ जिल्ह्याचे  पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 11 रुग्णवाहिका आणि 2 शववाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, माजी मंत्री पद्माकर वळवी, विजय चौधरी, अभिजित मोरे  तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स मुंबई यांच्या सामाजिक दायित्व निधीतून या रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. रुग्णवाहिकेसाठी 1 कोटी 22 लाख आणि शववाहिकांसाठी 30 लाख असा  एकूण 1 कोटी 52 लाख एवढा खर्च करण्यात आला आहे.  रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने मदत करणे शक्य होईल, असा विश्वास ॲड.पाडवी यांनी यावेळी व्यक्त केला. रुग्णवाहिकांचा उपयोग प्राधान्याने कोरोना चाचणी पथक व कोरोना रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी करण्यात येणार आहे.