नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोरोनाचे संकट गंभीर असून सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार डॉ.हिना गावीत, जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, विजय चौधरी, अभिजित मोरे, दिलीप नाईक आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. प्रशासनातर्फे कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्याची गरज आहे. कोरोना विषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी नागरिकांना आवाहन करावे. प्रत्येक गावात कोरोनाबाबत सर्वेक्षण आवश्यक असून त्याबाबत प्रशासनास सुचना देण्यात येतील. लोकप्रतिनिधींच्या सुचनाही कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी महत्वाच्या ठरतील, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात रक्ताचा मर्यादीत साठा असल्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करून नागरिकांना रक्तदानासाठी सर्वांनी प्रोत्साहित करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
खासदार डॉ.गावीत म्हणाल्या, दुर्गम भागातील संपर्क साखळीचा शोध तातडीने घेण्यात यावा आणि या भागातील नागरिकांना कोरोना चाचणीसाठी मार्गदर्शन करावे. कोरोना चाचणीचा अहवाल नागरिकांना लवकर उपलब्ध करून देण्यात यावा. जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करावे.
श्रीमती वळवी म्हणाल्या, रेमडिसीवीरचा पुरेसा साठा असल्यास खाजगी रुग्णालयांना उपलब्ध करून द्यावे आणि त्यावर योग्यरितीने नियंत्रण होणे आवश्यक आहे.
दुर्गम भागातील रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे आवश्यक असल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितले. रुग्णांना बेड उपलब्ध नसल्यास तपासणी करून औषधे देण्यात यावीत, असेही ते म्हणाले.
यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी रेमडिसीवीर औषधाची उपलब्धता, दर नियंत्रण, कोरोना चाचणीची सुविधा, रुग्णांवर औषधोपचार, बेड्सची उपलब्धता आदीबाबत सूचना केल्या.