नंदुरबार – ‘लॉकडाऊन काळात घरी असताना बाईंची खूप आठवण यायची. अशावेळी मोबाईलवर बोलायचो. त्यांच्या सहवासात असल्यावर घरची आठवण येत नाही’….नंदुरबार तालुक्यात कोठली शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थीनी वसतीगृह अधीक्षिका वंदना राऊत यांच्या विषयी भरभरून बोलतात. आश्रमशाळेतील वसतीगृहाला त्यांच्यामुळे संस्कारकेंद्राचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
वंदना राऊत मुळच्या यवतमाळ जिल्ह्यातील पूसद येथील आहेत. गेल्या 7 वर्षापासून त्या कोठली येथे कार्यरत आहेत. तशी अधिक्षिकेची भूमिका वसतीगृहातील शिस्त आणि तेथील व्यवस्थेपुरती मर्यादीत असते. मात्र त्यांना आपल्या संवेदनशीलतेची जोड देऊन वंदना यांनी ती अधिक व्यापक केली आहे. त्यांनी सामाजिक कार्य क्षेत्रातील आपल्या अभ्यासाचा कार्यक्षेत्राच्या ठिकाणी चांगला उपयोग केला आहे.
कोठली आश्रमशाळेतील 681 विद्यार्थींनींपैकी 560 निवासी असतात. त्यांना शिस्त लावण्यासोबत घरातील माणसाचा स्नेह देण्याचे काम वंदना करतात. त्या मुलींच्या आरोग्याच्या बाबतीत विशेष दक्ष असतात. म्हणूनच वसतीगृहातील स्वच्छतेवर त्यांचा अधिक भर असतो. निवासाच्या ठिकाणी टापटीप रहावी आणि वस्तू जागेवर ठेवाव्यात असा त्यांचा आग्रह असतो.
परिसरात परसबाग लावण आणि झाडे लावणे असे उपक्रम राबवून मुलींवर श्रमसंस्कारही इथे केले जातात. संध्याकाळची वेळ खऱ्या अर्थाने संस्काराची असते. मुलींना कवितेची गोडी लागावी म्हणून कविता वाचन, महापुरुषांची माहिती सांगणे, शिवणकलेची माहिती, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे असे उपक्रम सायंकाळच्या वेळेत केले जातात.
किशोरवयीन मुलींना वैयक्तिक आरोग्याबाबतही माहिती दिली जाते. रोज सायंकाळी वाचनाची सवय मुलींना जडली आहे. बारावीनंतरच्या अभ्यासक्रमाची माहितीही त्या मुलींना देतात. त्यांनी आपल्याकडील पुस्तके मुलींना वाचनासाठी उपलब्ध करून दिली आहेत. आश्रमशाळेतील मुलींच्या डोळ्यात डॉक्टर, इंजिनिअर, भारतीय पोलीस सेवेचे स्वप्न पेरण्याचे काम वंदनाताईंनी केले आहे.
मुलींच्या बोलण्यात जाणवणारा आत्मविश्वास त्यांच्यावर झालेले ज्ञानार्जनाचे संस्कार स्पष्ट करणारा आहे. इथल्या पाच विद्यार्थींनीना करिअर घडविण्यासाठी देखील त्यांनी मदत केली आहे. इतकेच नव्हे तर आश्रमशाळेतून बाहेर पडलेल्या मुलींशी नाते कायमचे जुळलेले असावे यासाठी त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून संवाद सुरू ठेवला आहे. एका खचलेल्या मुलीला संसारात धीर देण्याचे कामही त्यांनी कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच केले. हे सर्व करतांना आपल्या मुळ जबाबदारीकडे त्या तेवढ्याच गांभिर्याने लक्ष देतात. मुलीचे वडील आल्याशिवाय इतर कुणासोबतही मुलींना पाठवत नाही.
आश्रमशाळेत अधिक्षिकेची भूमिका तांत्रिक पद्धतीने न निभावता मुलींना कुटुंबातील वातावरण मिळावे यासाठी वंदना यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांचे चांगले परिणाम मुलींशी संवाद साधल्यावर जाणवतात. इथल्या वातावरणाशी समरस होऊन आपल्या दोन लहान चिमुकल्यांसोबत आश्रमशाळेतील मुलींनाही आईची माया देऊन मुलींच्या उज्व्ल भविष्यासाठी त्या करीत असलेले प्रयत्न निश्चितपणे कौतुकास्पद आहेत.
दिपाली कोकणी, 9 वी- त्या आईसारखे प्रेम करतात. रागावल्यानंतर जवळही घेत असल्याने चुकांची जाणीव चटकन होते. इथे शिस्त असली तरी घरची आठवण येत नाही.
शोभा कोकणी, 9 वी- आमचे वागणे, राहणीमान यावर बाईंचे लक्ष असते. त्याविषयी एकप्रकारचे प्रशिक्षणच इथे मिळते. सामान्यज्ञाना विषयी माहिती मिळत असल्याने मला डॉक्टर होण्यासाठी स्पर्धा परिक्षेला सामोरे जाणे सोपे होईल. माहिती चांगली मिळत असल्याने इतरांनाही सांगता येते.