नंदुरबार – अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या उंचवाडीचा डोंगराळ परिसर…. डोंगरामधून वाहणारी अरुंद पात्र असलेली नदी…. डोंगराच्या वरच्या भागाकडे गेल्यावर स्वच्छ, सारवलेले आणि बांबूच्या तट्ट्यांनी वेढलेले घर…हीच गावातील अंगणवाडी….नवख्या माणसाला चढताना दम लागतो. पण अंगणवाडी सेविका हिराबाई पाडवी यांच्यासाठी हे सोपे आहे. इथल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे सुरू ठेवले आहे.
शहरातील माणूस जेव्हा या भागातील पावसाळी परिस्थितीची कल्पना करतो तेव्हाच त्याला हिराबाईंच्या कामाचे महत्व आणि त्यातील आव्हाने कळतात. गावापासून काही अंतरावर असलेल्या लिंबीपाडापर्यंत पोषण आहाराचे वाहन येते. तेथून तो आहार डोक्यावर घेवून खालच्या बाजूस अवघड वाटेने उतरायचे, नदी ओलांडायची आणि परत अरुंद वाटेने वरच्या बाजूस चढत अंगणवाडीपर्यंत पोहोचायचे, हे त्यांच्यासाठी नेहमीचेच. कामाचा आनंद घेण्याची जणू त्यांना सवयच जडल्याने त्यांच्याशी बोलताना हे काम अत्यंत सोपे वाटते.
परिसरातील 83 घरे डोंगर परिसरात विखुरलेली आहेत. कोरोना संकटकाळात काही महिला पोषण आहार घेण्यासाठी अंगणवाडीत येतात, मात्र काहींना आणि विशेषत: गरोदर व स्तनदा मातांना घरपोष पोषण आहार द्यावा लागतो. अशावेळी डोंगरावरील पायवाटांनी त्यांची सेविका वजाबाई यांच्यासह भटकंती होते. गरोदर मातांसाठी गृहभेटी करताना अशीच कसरत करावी लागते. त्यांचे कष्ट इथवरच थांबत नाही, तर एखाद्या महिलेला किंवा बालकाला उपचाराची गरज असेल तेव्हा आरोग्य यंत्रणेशी मोबाईलने संपर्क साधण्यासाठी त्यांना डोंगराच्या वरच्या बाजूस चढून जावे लागते.
गावात 0 ते 6 वयोगटातील 58 मुले आहेत. विशेष म्हणजे दुर्गम भाग असूनही अतितीव्र कुपोषीत गटातील एकही बालक त्यांच्या क्षेत्रात नाही. अशा दोन मुलांना त्यांनी गेल्या वर्षात सामान्य गटात आणले आहे. मध्यम कुपोषित गटातील 4 बालकांच्या वजनातही चांगली सुधारणा आहे. पालकांच्या समुपदेशनासाठी त्यांनी स्थानिक भाषेचा प्रभाविपणे उपयोग केला आहे.
पावसाळ्यात ही जबाबदारी पार पाडणे एक प्रकारची परीक्षा असते. मात्र त्या परिस्थितीतही त्यांच्या कामातील सहजता आणि उत्साह कमी होत नाही. काहीवेळा नदीला पाणी वाढल्याने पलिकडच्या पाड्यावर अडकून रहावे लागते. निसरड्या वाटेवरून डोक्यावर वजन घेऊन चालण्याचे दिव्य पार पाडावे लागते. मात्र न डगमगता गेली 16 वर्षे त्या हे काम करीत आहेत.
आपल्या दोन मुलींसमोर त्यांनी कर्तव्यपरायणतेचा चांगला आदर्श प्रस्तूत केला आहे. त्यामुळे त्यादेखील बालकांना पूर्वशिक्षण देण्याचा आनंद घेतात, आईला मदतही करतात. गरीबांच्या सेवेसाठी त्यांनी अधिकारी व्हावे असे हिराबाईंना वाटते. म्हणून मुलींना उच्च शिक्षण देण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. गावात आलेले एखादे वृत्तपत्र, हातात पडलेले पुस्तक वाचून त्या नवे ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात.
आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा गवगवा न करता त्यांची ही ‘साधना’ सुरू आहे. विशेष म्हणजे त्यात त्यांना आनंद आहे आणि आपण काही विशेष करतो आहे अशी भावनादेखील नाही. त्यामुळेच दुर्गम भागातील माता-बालकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्यांचे कार्य पाहिल्यावर त्यांच्याविषयी ‘पंखास बळ दे नवे, झेपावण्या आकाश दे’ अशीच भावना मनात आल्याशिवाय रहात नाही. संकटाचा सहजपणे सामना करणाऱ्या आणि बालकांच्या पोषण आहारासाठी डोंगरावरील वाटांवरून चालणाऱ्या या ‘हिरकणी’च्या कार्याला सलाम करावास वाटतो.
हिराबाई पाडवी- काहीवेळा भिती वाटते, पण लाभार्थी आहारापासून वंचित राहता कामा नये. पावसाळ्यात खरी परीक्षा असते. अडचणी आल्या तरी मी आणि माझी मदतनीस थांबत नाही. पावसाळ्यात नदीच्या पाण्यातून यावे लागते.
खारकी पाडवी, लाभार्थी माता- ताईंमुळे लसीकरण, आरोग्य तपासणी वेळेवर होते. नाहीतर या भागात आमच्या मुलांचे आरोग्य चांगले ठेवणे कठीण होते. अंगणवाडीमुळे मुलांना शिकवावे असे वाटू लागले. आता 6 वर्षानंतर त्यांना मोठ्या शाळेत पाठवेल.