नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘न्युट्रिशन इंडिया’ कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य व पोषण विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन खासदार डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते झाले.
यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड ,महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानाचे कार्यक्रम अधिकारी निलेश गंगावणे, कुपोषण मुक्त नंदुरबार अभियानाच्या प्रमुख डॉ.नवनीता रुद्रा आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार डॉ.हिना गावीत म्हणाल्या की, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहूल भागातील बालक आणि महिलांच्या आरोग्य व पोषणसंबंधी सेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि प्लॅन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 2019 मध्ये न्युट्रिशन इंडिया कार्यक्रम हा पथदर्शी प्रकल्प नंदुरबार व अमरावती जिल्ह्यात सुरु आहे. जिल्ह्यात अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील 100 गावांमध्ये 22 समुदाय पोषण कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम चालू आहे.
लहान मुलांना पोषण पुनर्वसन केंन्द्रात दाखल करणे, गर्भवती महिलांना संस्थागत प्रसूती व इतर आरोग्य सुविधांचा लाभ देणे, आदिवासी महिलांमध्ये पोषण,आरोग्य सेवा आणि सवयीबद्दल जनजागृती करुन कुपोषण व आरोग्य निर्देशांकात सुधारणा घडवून आणणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. नंदुरबार जिल्ह्यात झालेले कुपोषणमुक्तीचे काम देशभरात चांगले असल्याचे सर्वेक्षणाच्या अहवालावरून स्पष्ट होते. याचे सर्व श्रेय अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांना आहे, असे त्यांनी सांगितले.
जनजागृतीसाठी दिल्ली येथून 1600 किलोमीटरचे अंतर पारकरुन आलेल्या 7 बाईक राईडर महिलाचे डॉ.भारुड यांनी कौतुक केले. ते म्हणाले, दुर्गम भागातील कर्मचारी गर्भवती मातांचे प्रबोधन आणि संस्थात्मक प्रसूतीसाठी चांगले प्रयत्न करीत आहेत. येणाऱ्या वर्षात अधिक कुपोषणमुक्तीच्या क्षेत्रात अधिक चांगले होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुपोषणमुक्तीच्या प्रयत्नांचे आणि कामांचे विश्लेषण करून त्यात गरजेनुसार आवश्यक बदल करावा, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी खासदार गावीत यांच्या हस्ते समुदाय पोषण कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली.