नंदुरबार – तापी-बुराई योजनेचे पाणी पहिल्या टप्प्यात शनिमांडळपर्यंत आणण्यात येईल आणि त्यासोबत इतरही ठिकाणी साठवण करण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस तापी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बसवंत स्वामी, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उदेसिंग पाडवी, जि.प.चे उपाध्यक्ष राम रघुवंशी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर आदी उपस्थित होते.
श्री.पाटील म्हणाले, पाईपलाईनद्वारे पहिल्या टप्प्यातील नियोजित ठिकाणी पाणी साठवण करण्याची सुविधा करण्यास कालावधी लागणार असल्याने सदर सुविधा होईपर्यंत शनिमांडळपर्यंत पाणी आणल्यास परिसरातील गावांना याचा लाभ होऊ शकेल. तसेच ठाणेपाडा-2 मध्ये पाणी आणून नंदुरबार शहराला टंचाई प्रसंगी पाणी देता येईल यासाठी व्यवस्था करण्यात यावी.
जिल्ह्यातील 22 राज्यस्तरीय सहकारी उपसा सिंचन योजनेची आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर पाईपलाईनमध्ये गळती झाल्यास तिच्या दुरुस्तीच्या तरतूदीसह प्रस्तावास मान्यता घेण्यात यावी. 24 तासाच्या आत गळती दुरूस्ती होईल अशी यंत्रणा असणे गरजचे आहे. या योजनेच्या आवश्यक कामाबाबत लवकरच मुंबई येथे बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. नवापूर तालुक्यातील पूर्ण झालेल्या योजनांचे पाणी शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असेही श्री.पाटील म्हणाले.
यावेळी लघु पाटबंधारे योजना, देहली, नागन, दरा, कोरडी, रामपूर, रापापूर, इच्छागव्हाण, पानबारा, उकाई धरणातील पश्चजलातून पाणी उपसा सिंचनद्वारे वापरणे, नर्मदा-तापी वळण योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.