राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदान आणि मतदार जागृतीत सहभागी व्हा-डॉ.राजेंद्र भारुड
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी मतदान करणे आवश्यक असून युवक आणि नागरिकांनी राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदान करावे आणि मतदार जागृतीच्या कार्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.
तहसिल कार्यालय नंदुरबार येथे आयोजित 11 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उप जिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार राहुल वाघ आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, जिल्ह्यात दुर्गम भागात मतदान केंद्र असूनही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम करीत मतदानाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत नाशिक विभागात नंदुरबार जिल्ह्याने सर्वात चांगले काम केले. नागरिकांनी मतदानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यास लोकशाही बळकट होईल, असे ते म्हणाले.
यावेळी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धांमध्ये विजेत्या झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात ज्येष्ठ मतदार व नवमतदारांना ई-एपीक अर्थात इलेक्ट्रॉनिक ओळखपत्राचे वाटप मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मतदार जागृतीची शपथ घेण्यात आली.
प्रारंभी जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते तहसिल कार्यालयातील अभिलेख कक्षाचे तसेच नुतन तहसिल कार्यालयाच्या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ.भारुड यांनी यावेळी अभिलेख कक्षाची पाहणी केली.
प्रास्ताविकात श्री.थोरात यांनी मतदार दिवस आयोजनाबाबत माहिती दिली.