नंदुरबार – जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात कोरोनाचा वाढलेला संसर्ग लक्षात घेता संसर्ग अधिक असलेल्या भागावर लक्ष केंद्रीत करून या भागातील सर्वेक्षण वाढवावे, अशा सूचना राज्य शासनाचे कोविड टास्क फोर्स सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी  डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते.

डॉ.साळुंखे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्याने कोरोना नियंत्रणात चांगली कामगिरी केली. मात्र गेल्या काही दिवसात बाधितांची संख्या वाढत असल्याने विशिष्ठ भागाकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. कोरोना बाधितांची संख्या अधिक असलेल्या गावात संपर्क साखळी शोधणे आणि अधिक जोखिमीच्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यावर भर द्यावा. तापाचे रुग्ण अधिक असणाऱ्या भागातदेखील तपासणी करण्यात यावी. कोरोना नियंत्रणासाठी नवीन पद्धत न अवलंबता आहे त्या पद्धतीत आवश्यक बदल करावे. जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीचा अधिक वापर होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांकडून 48 तासानंतर  माहिती घेण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.