नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : बर्ड फ्लू रोगाचा प्रादूर्भाव महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आढळून आला असल्याने जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक तसेच नागरिकांनी कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फॉर्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कोंबड्या मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये माहिती द्यावी.
मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा परस्पर विल्हेवाट लावू नये. प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 च्या कलम 4 (1) अन्वये प्रत्येक पशूपालक अथवा व्यक्ती, शासनेत्तर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, यांनी रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजिकच्या उपलब्ध पशूवैद्यकाला लेखी स्वरुपात देणे बंधनकारक आहे.
अंडी व कुक्कूट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनीटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. तसेच बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरविण्यात येऊ नये. मृत पक्षांची माहिती देण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 18002330418 किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त (02564-210016) तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद,नंदुरबार (02564-210236) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नंदुरबार यांनी केले आहे.