नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : पोलिस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सन 2020-2021 योजनेंतर्गत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील इच्छुक उमेदवारांना शासनामार्फत विनामूल्य पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी निवड चाचणी बुधवार 6 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता पोलिस परेड ग्राउंड नंदुरबार येथे होणार आहे.
प्रशिक्षणासाठी अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार हा शारिरीकदृष्टीने निरोगी व 12 वी उत्तीर्ण असावा. प्रशिक्षणार्थींचे वार्षिक कौटुंबिक उत्पन 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे. उमेदवार हा अल्पसंख्याक मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शिख, पारसी, जैन व ज्यू या समाजातील असावा. उमेदवाराचे वय 18 ते 25 वयोगटातील असावे. पुरूष उमेदवारासाठी उंची 165 से.मी व महिलासाठी 155 से.मी तर पुरुषासाठी छाती 79 से.मी. फुगवून 84 से.मी. इतकी असावी. शैक्षणिक अर्हता, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयाअंतर्गत नाव नोंदणी दाखला, ओळखपत्र, आधार कार्ड, बँक खाते पासबुक इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
प्रशिक्षणाचे स्वरुप
निवड झालेल्या उमेदवांरास 2 महिने कालावधीचे प्रशिक्षण दिले जाईल. दरम्यान दररोज 3 तासांचे वर्ग प्रशिक्षण व दोन तासांचे मैदानी प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणार्थींस प्रशिक्षणा दरम्यान 1 हजार 500 प्रती माह याप्रमाणे विद्यावेतन व गणवेश, बूट, मोजे, बनियानसाठी 1 हजार इतके एकरकमी अनुदान दिले जाईल. संस्थेमार्फत प्रशिक्षणादरम्यान मोफत चहापान व अल्पोहार देण्यात येईल. प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षण दरम्यान निवासाची व्यवस्था स्वत: करावी लागेल.
इच्छुक उमदेवारांनी 6 जानेवारी 2021 रोजी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील पोलीस परेड ग्राऊंड नंदुरबार येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.