नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गंत जिल्ह्यातील आरोग्य व पोषण निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी 21 डिसेंबर 2020 ते 9 जानेवारी 2021 या कालावधीत विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून मोहिमेच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी जुने तोरणमाळ येथील अंगणवाडी केंद्राला भेट दिली.
श्री.गावडे म्हणाले, विशेष मोहिमेअंतर्गत 100 टक्के माता व बालकांची तपासणी करण्यात यावी. नियोजित दिवशी माता किंवा बालक अनुपस्थित राहिल्यास त्या भागात भेट देण्यासाठी पुढील दिवस निश्चित करण्यात यावा. कुपोषित बालक आढळल्यास बालविकास केंद्र किंवा बाल उपचार केंद्रात त्वरीत उपचार सुरू करण्यात यावेत.
श्री.गावडे यांनी झापी आणि खडकी येथील आरोग्य केंद्र आणि अंगणवाडीला भेट देऊन मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. या मोहिमेअंतर्गत 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी व लसीकरण करण्यात येणार आहे, तसेच सॅम आणि मॅम बालकांचा शोध घेण्यात येणार आहे. मोहिमेसाठी गांव व पाड्यानिहाय सुक्ष्म नियोजन तयार करण्यात आले असुन पथकांचे संनियंत्रण व पर्यवेक्षण करण्यासाठी जिल्हास्तरावरुन अधिकाऱ्याची पूर्ण वेळ मोहिम कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.
मोहिमेत 0 ते 6 वर्ष वयोगटातील सर्व बालकांचे वजन, उंची, लांबी घेऊन सॅम आणि मॅम बालकांचा शोध घेण्यात येणार आहे. स्थलांतरीत बालकांची यादी देखील तयार करण्यात येणार आहे. आजारी बालकांचे निदान करुन उपचार करण्यासाठी संदर्भ सेवा देण्यात येणार आहे, त्यासोबतच बाळ कुपोषित राहू नये याकरिता घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात माहे जून आणि जुलै महिन्यात विशेष मोहिम राबविण्यात आलेली होती त्यात सॅम व मॅम बालकांची स्क्रिनिंग करुन 3 हजार 710 सॅम आणि 18 हजार 644 मॅम बालकांचा शोध घेण्यात आला होता. या बालकांवर ग्रामविकास केंद्र तसेच, बालउपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये उपचार करण्यात येत असुन त्याबालकांमध्ये सुधारणा आढळून येत आहे.
ग्राम बालविकास केंद्रात उपचार घेऊन सुधारणा झालेल्या बालकांचे वैद्यकीय अधिकारी मार्फत नियमित तपासणी करण्यात येत असून ज्या बालकांमध्ये तीन महिने उपचार करुनही सुधारणा आढळून येत नसल्यास अशा बालकांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करुन पुढील संदर्भ सेवा देण्यात येत आहे.
मोहिमेसाठी जिल्ह्यास्तरावर 291 पथक नियुक्त केले असून त्यात 284 वैद्यकीय अधिकारी, 56 अंगणवाडी पर्यवेक्षिका, 153 आशागट प्रवर्तक, 14 आरोग्य सहायक आणि 10 स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी अशा एकूण 517 वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्याचा समावेश आहे.