नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या घेतल्यानंतर रिक्त असलेल्या जागा विशेष फेरीद्वारे भरण्यात येणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
विद्यार्थी www.maa.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात. सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली, अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
डी.एल.एड. प्रवेशासाठी खुल्या संवर्गातील विद्यार्थी 49.5 टक्के, व इतर संवर्गातील विद्यार्थी 44.5 टक्क्यांसह 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 22 ते 26 डिसेंबर 2020 तारखेपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरता येतील. पडताळणी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्रांची पडताळणी करणे व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश पात्र करण्याचा कालावधी 22 ते 27 डिसेंबर पर्यंत राहील. खुल्या संवर्गासाठी प्रवेश अर्ज शुल्क 200 तर इतर संवर्गासाठी 100 रुपये आहे.
अर्ज पूर्ण भरुन मान्य केलेले परंतू प्रवेश न घेतलेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तसेच अर्ज अपूर्ण किवा दुरुस्ती असल्यास नव्याने प्रवेश अर्ज भरुन इच्छुक असलेले सर्व उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज ऑनलाईन अप्रुव्ह केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेशप्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्यांने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करुन लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल, लॉगीनमधून प्रिंट घ्यावयाची आहे व त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसाच आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे. प्रवेश प्रक्रियेच्या या विशेष फेरीनंतर प्रवेशासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.जे.ओ. भटकर यांनी कळविले आहे.