नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू व मार्गदर्शकांच्या कार्याचे आणि योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी देण्यात येणाऱ्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
सन 2018-2019, 2019-2020, व 2020-2021 या वर्षाकरीता जिल्हा क्रीडा पुरस्कार पुरुष व महिला गटातील गुणवंत खेळाडू, दिव्यांग खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी 11 जानेवारी 2021 रोजी सादर करावयाचे आहेत. पुरस्काराची नियमावली www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पुरस्काराकरीता 1 जुलै ते 30 जून या कालावधीतील कामगिरी ग्राह्य धरली जाईल. या व्यतिरक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगिरी केलेल्या खेळाडूंना शासनाच्या नियमानुसार थेट पुरस्कार देण्यात येतो. प्रमाणपत्र , स्मृती चिन्ह व रोख 10 हजार रुपये पुरस्काराचे स्वरुप आहे.
विहीत नमुन्यातील अर्ज 18 ते 28 डिसेंबर 2020 या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपलब्ध असतील. विहित नमुन्यात भरलेला अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांची छायांकित कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो, बंद लिफाफ्यात 11 जानेवारी, 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे.