नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :- क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मुलन अभियान वेळेत पूर्ण करा आणि गेल्या पाच वर्षात क्षयरोग रुग्ण अधिक आढळलेल्या गावातील प्रत्येक घरात आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, डॉ.राजेश वळवी, सहायक संचालक डॉ. अभिजीत गोल्हार आदी उपस्थित होते.
डॉ.भारुड म्हणाले, संयुक्त क्षयरुग्ण व कुष्ठरोग शोध अभियानात आरोग्य तपासणी चांगल्यारितीने करण्यात यावी. अधिक रुग्ण आढळणाऱ्या गावांवर लक्ष केंद्रीत करावे. इतरही आजार असलेल्या क्षयरोग रुग्णांच्या उपचाराकडे विशेष लक्ष द्यावे. कुष्ठरोग व क्षयरोग उपचारासाठी इमारत व आवश्यक मायस्क्रोपसाठी प्रस्ताव सादर करावा.
तंबाखुमुक्तीसाठी गावनिहाय लक्ष केंद्रीत करून अधिक प्रयत्न करावे. स्थानिक भाषेत संदेश देणारी लघुचित्रफीत तयार करण्यात यावी. ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रबोधन करण्यात यावे. तंबाखुमुक्त होणाऱ्या गावाचा 26 जानेवारी रोजी सत्कार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्य यंत्रणेस दक्ष राहण्याच्या सुचना दिल्या. किमान एक हजार ऑक्सिजन बेड जिल्ह्यात उपलब्ध होतील असे नियेाजन तयार ठेवावे. मनुष्यबळाचा विचार करता अधिक संख्येने वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना उपचाराबाबत प्रशिक्षण द्यावे. आवश्यतेनुसार औषध साठा तयार ठेवावा, असेही डॉ.भारुड म्हणाले.
संयुक्त क्षयरोग व कुष्ठरोग शोध अभियान 1 ते 16 डिसेंबर या कालावधीत सुरू राहणार असून 3 लाखापेक्षा अधिक घरापर्यंत 1284 पथके पोहोचणार आहेत. 371 पर्यवेक्षकांची अभियानासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते क्षयरोग निर्मुलनासाठी योगदान देणाऱ्या डॉ.वळवी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.