नंदुरबार :- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार द्वारा नंदुरबार जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकासाची पुढील दिशा ठरविण्यासाठी तोरणमाळ परिसरात दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यामध्ये लेगापानी, कुंड्या, गण्यारचापड़ा, खड़की या आदिवासी भागातील दुर्गम गावांना प्रत्यक्ष गृहभेटी देण्यात आल्या.
या दौऱ्यामध्ये स्थानिक पदाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक इत्यादी घटकांच्या भेटी घेण्यात आल्या. भेटीदरम्यान दुर्गम भागातील विविध समस्या, विविध शैक्षणिक संकल्पना, स्थलांतर, विद्यार्थी उपस्थिती, ऑनलाईन – ऑफलाईन शिक्षणाची स्थिती, बालरक्षक शिक्षकांचे कार्य, शिक्षणाच्या सोयी – सुविधा, विद्यार्थ्यांचा आहार, स्वयंसेवी संस्थांचे प्रयत्न, अध्ययन निष्पत्ती, प्रशिक्षणाची स्थिती व आवश्यकता इत्यादी विषयाबाबत त्या – त्या बाबींशी संबंधित व्यक्तींशी तपशीलवार चर्चा करण्यात आली. दुर्गम भागातील बालकांसाठी शिक्षणाच्या उपलब्ध संधी अधिक प्रभावी करून देण्यासाठी कोणते प्रयत्न करता येतील, याविषयी संबंधितांची मते जाणून घेण्यात आली.
दौऱ्यात संपूर्ण स्थितीचे निरीक्षण व अभ्यासाअंती या भागासाठी विशेष शैक्षणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता प्राचार्य डॉ भटकर यांनी व्यक्त केली. अभ्यास दौऱ्यामध्ये संस्थेचे अधिव्याख्याता श्री. बी.आर. पाटील, डॉ. संदीप मुळे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री योगेश सावळे, विषय सहायक श्री. प्रकाश भामरे, तसेच विषय साधन व्यक्तीनी सहभाग घेतला .