नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नोव्हेंबर महिन्यातील वातावरण कपाशीवरील बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असल्याने आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
कापसाला कमी बोंडे असून ते पक्व होण्याच्या अवस्थतेत असल्यास मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी फवारणीचा निर्णय घ्यावा. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी कपाशीचे पीक चार ते पाच फुट उंचीचे असून त्याच्या फाद्याही दाटलेल्या आहेत. अशा परिस्थितीत किटकनाशकाची फवारणी करतांना विषबाधा होऊ शकते त्यामुळे कपाशीवर फवारणी करताना शेतकऱ्यांनी फवारणी किटचा वापर करावा. फवारणी करताना सकाळी वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी.
शेताचे सर्वेक्षण करतांना बोंडामध्ये गडद गुलाबी रंगाची तिसऱ्या ते चौथ्या अवस्थेतील अळी तीन ते चार दिवसात कोष अवस्थेत जावून पुढील 10 ते 15 दिवसांनी कोषातील पतंग निघून अंडे टाकण्यास सुरुवात करतात आणि गुलाबी बोंड अळीच्या दुसऱ्या पिढीच्या प्रादुर्भावास सुरुवात करतात. अशा ठिकाणी पतंगाच्या व्यवस्थापनासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमेन सापळ्यांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनंत पोटे यांनी केले आहे.